ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेकी संघटनेने सुरक्षा रक्षकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 25 पेक्षा जास्त अफगाण सुरक्षा जवान ठार झाले. अफगाण अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचे ट्विट एका वृत्तसंस्थेने केले आहे.
सुरक्षा दले एका जिल्ह्यात तालिबानी कारवाईसाठी जात होती. त्यावेळी घरांमध्ये लपलेल्या तालिबानी अतिरेक्यांनी सुरक्षा रक्षकावर अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात 25 हून अधिक अफगाण जवान ठार झाले. या हल्ल्यात काही अतिरेकीही मारले गेले आहेत. मात्र, अद्याप त्याची आकडेवारी समजू शकली नाही. सध्या सुरक्षा दल आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे तखार प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते जावेद हेजरी यांनी सांगितले.
दरम्यान, तखार प्रांतीय आरोग्य संचालक अब्दुल कौम यांनी या घटनेला दुजोरा दिला, पण प्रांताच्या उपपोलीस प्रमुखासह 34 सुरक्षा रक्षक या हल्ल्यात ठार झाल्याचे त्यांनी सांगितले.









