पणजी मनपा निवडणूक होणार मतदान यंत्राद्वारे
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 11 पालिका आणि पणजी महानगरपालिका यांच्या प्रस्तावित निवडणुका 20 मार्च रोजी घेण्याचा प्रस्ताव असून अद्याप त्याला अंतिम मान्यता मिळालेली नाही. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगातर्फे तारीख घोषित करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे, अशी माहिती आयोगातील सुत्रांनी दिली आहे.
पणजी मनपाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (इव्हीएम) घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मनपाच्या एकूण 30 प्रभागात ही निवडणूक होणार आहे. फोंडा व सांखळी वगळता अन्य पालिकांची निवडणूक पारंपरिक पद्धतीने म्हणजेच मतपत्रिकेद्वारे घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी राज्य निवडणूक आयुक्तांनी या प्रक्रियेचे सर्व नियोजन केले असून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
मनपाचे 10 प्रभाग महिलांसाठी राखीव
मनपाचे 30 पैकी 10 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीसाठी क्र. 2 हा एकमेव प्रभाग राखीव आहे तर अनुसूचित जातीसाठी कोणताही प्रभाग राखीव ठेवण्यात आलेला नाही. महिलांसाठी राखीव प्रभागांपैकी 12, 18 आणि 24 हे प्रभाग ओबीसी महिलांसाठी तर 4, 5, 9, 15, 21, 27 आणि 30 हे प्रभाग सर्वसामान्य महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पोटनिवडणुका एकाचवेळी
पणजी महानगरपालिकेसह राज्यातील 11 पालिका, नावेली जिल्हा पंचायत तसेच 20 ग्राम पंचायतींच्या 22 प्रभागात पोटनिवडणूक एकाचवेळी घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने चालविली आहे. पोटनिवडणूक होणाऱया पंचायतींमध्ये आगशी (वॉर्ड क्र. 7), मेरशी (वॉर्ड क्र. 4 आणि 11), भिरोंडा (वॉर्ड क्र. 3), म्हावशी (वॉर्ड क्र. 2 आणि 3), पिसुर्ले (वॉर्ड क्र. 7), हरमल (वॉर्ड क्र. 3), कोरगाव (वॉर्ड क्र. 7), मोरजी (वॉर्ड क्र. 5), कारापूर सर्वण (वॉर्ड क्र. 9), मुळगाव (वॉर्ड क्र. 2), ओशेल (वॉर्ड क्र. 7), वेर्ला काणका (वॉर्ड क्र. 6), बस्तोडा (वॉर्ड क्र. 4), असोळणा (वॉर्ड क्र. 7), नावेली (वॉर्ड क्र. 2), भाटी (वॉर्ड क्र. 6), रिवण (वॉर्ड क्र. 7), चिखली (वॉर्ड क्र. 2), वेलिंग प्रियोळ कुंकळ्ळी (वॉर्ड क्र. 4), बाळ्ळी अडणे (वॉर्ड क्र. 8), यांचा समावेश आहे.








