नव्वदच्या आसपासची गोष्ट आहे. ओळखीच्या एका जोडप्याला दोन मुली होत्या. सोनम तीनेक वर्षांची. हेमा थोरली. दोघींचे आईवडील नोकरीत होते. शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा असल्याने दोघींना दिवसभर आमच्या घरी सोडून जात. दोघी आमच्या मुलांबरोबर राहात.
हेमा तेव्हाही प्रगल्भ आणि प्रौढ वाटायची. अतिशय शांत. आली की खोलीचा कोपरा धरून एखादं पुस्तक वाचत किंवा नुसतीच शांत बसून राहायची. कानकोंडय़ा पाहुणीसारखी. कधी कधी तिची धाकटी बहीण सोनम कपडे ओले करायची. तेव्हा ही चिमुकली तायडी उठून तिची चड्डी बदलून ओली चड्डी पिशवीत ठेवायची. खेळणाऱया मुलात सोनम सर्वात लहान होती. कोणाशी भांडण झालं की मुसमुसायला लागे. अशा वेळी तायडी तिला जवळ घेऊन थोपटायची. मोठय़ा माणसांनी क्वचित सोनमला डबा खाताना अन्न सांडलं किंवा हट्ट केला म्हणून रागावलं तर तायडी तिला मिठीत घेऊन बसायची. दोघींमध्ये घट्ट नातं होतं.
दिवस जात राहिले. हेमा आणि सोनम मोठय़ा होत गेल्या. सणावारी आमच्याकडे येत. कधी आम्ही त्यांच्याकडे जायचो. हेमा कॉलेजमध्ये गेली. याच काळात ती ढोल वाजवायला शिकली. एकदा कुठल्या मिरवणुकीच्या ढोल पथकात तिचा फोटो पेपरात झळकला. ढोल पथकाचा सराव, कराटेचा क्लास सांभाळून ती सायन्स साईडचा अभ्यास, प्रॅक्टिकल्स, जर्नल्स वगैरे भानगडी पूर्ण करून चांगल्या मार्कांनी पदवीधर झाली. काही दिवस नोकरी केली आणि अचानक तिचं लग्न ठरलं. लग्न म्हणजे प्रेमविवाह. दरम्यान सोनमदेखील पदवीधर झाली. घरगुती व्यवसायात पडली. हेमाला लग्न मानवलं. तिच्यासाठी नवरा आईवडिलांपासून वेगळा झाला. दोघे स्वतंत्र सदनिकेत राहू लागले. त्यांना मुलगी झाली. आणि परवा परवाची गोष्ट आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. पाच वर्षे झाली म्हणून जंगी कार्यक्रम आखला होता. सोसायटीतल्या सर्वांना आमंत्रण. जिन्यात आणि लिफ्टमध्ये रंगीत फुगे वगैरे… कार्यक्रमाच्या आधी अर्धा तास हेमाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कारण कोणालाच समजलं नाही.
आम्ही सांत्वनाला गेलो. थोडा वेळ निःशब्द बसलो. सोनम बाहेर गेली होती. ती आली तेव्हा मला तिचं बालपण आठवलं. तिच्या खांद्यावर हात ठेवला तर ती रडायला लागली. तिला जवळ घेतलं. हेमा घ्यायची तशी. पण मीच काय, कोणीच तिची तायडी होऊ शकणार नाही.
तायडीनं असं का केलं असेल.