वृत्तसंस्था/ हैदराबाद
पहिली इंडियन तायक्वांदो प्रिमियर लिग स्पर्धा दिल्लीत 22 ते 26 जून दरम्यान आयोजित केली आहे. सदर स्पर्धा दिल्लीतील तालकतोरा स्टेडियममध्ये होईल.
पुरुषांची ही पहिली प्रिमियर लिग तायक्वांदो स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेला चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय लिग तायक्वांदो स्पर्धा डोहा कटार येथे होणार आहे. भारतामध्ये या स्पर्धेनंतर महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी लिग तायक्वांदो स्पर्धा भरविली जाणार असल्याची माहिती भारतीय तायक्वांदो फेडरेशनचे संचालक आणि संस्थापक वेंकट गंजम यांनी दिली आहे. तायक्वांदो या क्रीडा प्रकाराचा जन्म दक्षिण कोरियात झाला. दक्षिण कोरियामध्ये या क्रीडा प्रकाराला मार्शल आर्ट असे संबोधले जाते. या क्रीडा प्रकारात किकिंग आणि पंचिंग असते. सध्या देशातील सुमारे 200 देशांमध्ये किमान 2 कोटी अॅथलिट्स तायक्वांदोचा नियमित सरावर करीत असून तायक्वांदोला ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात मान्यता मिळाली आहे.









