वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्हय़ातील वैयमपट्टी भागातील एका फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी सकाळी दुर्घटना घडली आहे. फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मेघनाथ रेड्डी यांनी दिली आहे. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.
यापूर्वी शनिवारी म्हणजेच 1 जानेवारी रोजी विरुधुनगर जिल्हय़ातील एका अन्य कारखान्यात मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 4 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 8 जण जखमी झाले होते. ही दुर्घटना नागलपुरम गावात घडली होती. फटाक्यांच्या विस्फोटात कारखान्याची इमारतच कोसळली होती. पोलिसांनी अद्याप या दुर्घटनेमागील कारणांचा शोध लावलेला नाही.









