‘निवार’ चक्रीवादळाचा धोका : पाँडिचेरीतही अलर्ट : रेल्वे-विमानसेवा तात्पुरती स्थगित
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडू आणि पाँडिचेरीला ‘निवार’ चक्रीवादळाचा धोका असून किनारपट्टी भागात एनडीआरएफची पथके सतर्क झाली आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार चक्रीवादळ गुरुवारी तामिळनाडूतील मामल्लापूरम व कराईकलच्या समुद्रकिनाऱयाला धडकण्याची शक्मयता आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावेळी ताशी 120 ते 130 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्मयता आहे. या भागातील विमानसेवा बुधवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. तसेच रेल्वेसेवाही अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. बुधवारी दुपारपासून चेन्नईसह अनेक भागात सुरू झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच दीड लाख लोकांचे अन्यत्र स्थलांतर केले आहे.
तामिळनाडू व पाँडिचेरीमध्ये चक्रीवादळाचे परिणाम दिसत असून बुधवारी अनेक भागात जोरदार पाऊस पडत होता. तसेच समुद्रात मोठय़ा लाटा उसळत होत्या. हवामान खात्याने चक्रीवादळाची शक्मयता वर्तविल्याने अनेक विमान आणि रेल्वे फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. तर इंडिगोने 49 उड्डाणे रद्द केली आहेत. हवामान खात्याने तामिळनाडू आणि पाँडिचेरीत ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. वादळाची शक्मयता लक्षात घेता एनडीआरएफ पथकांनी संभाव्य संकटाशी मुकाबला करण्याची तयारी सुरू केली आहे.
तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने समुद्रकिनारी 465 रुग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. तर चेन्नईमध्ये 129 मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत. तर 8 शिबिरांमध्ये 312 जणांनी आश्रय घेतला आहे. तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई, नागापट्टीनम, कुड्डालोर, विल्लुपूरम, तंजावर, चेंगालपेट, आरियालूर, पेरमबलूर, कलाकुरुची, तिरुवन्नामलाई आणि तिरुवल्लूरमध्ये वादळाचा फटका बसण्याची शक्मयता आहे. या वादळाची व्याप्ती व धोका गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.
अन्य राज्येही चक्रीवादळाच्या छायेत
तामिळनाडू व पाँडिचेरीच्या समुद्रकिनाऱयाच्या भागात बुधवारी दुपारपासूनच वादळी वारे वाहत असून जोरदार पाऊस होत आहे. या पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे. काही भागात झाडे आणि बॅनर्सची पडझड झाल्याचे दिसून येत होते. कर्नाटकलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाची तीव्रता वाढल्यास आंध्रप्रदेश, दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण ओडिशालाही वादळाचा तडाखा बसण्याची शक्मयता वर्तविली आहे.
पाँडिचेरीच्या समुद्रकिनाऱयाजवळील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत असल्याचे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सांगितले. जनतेच्या मदतीसाठी आपत्कालीन नियंत्रण पथक तैनात केले आहे.
पाऊस-वाऱयामुळे झाडे कोसळली
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळाची एकंदर वाटचाल पाहता या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सावधगिरी म्हणून सखल भागांमध्ये राहणाऱया नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. मच्छिमारांनाही समुद्रात बोटी न नेण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.