पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना शनिवारी रात्री गोमेकॉत हलविण्यात आले आहेत. शुक्रवारी कोविड चाचणीत ते पॉझिटीव्ह आले होते. त्यांनी स्वतःच तशी माहिती दिली होती. परंतु ते घरीच विलगिकरणात राहिले होते. शनिवारी सायंकाळी त्यांना ताप आल्यामुळे रात्री गोमेकॉत हवलिवण्यात आले आहे.
बुधवार दि. 24 मार्च पासून सुरू झालेल्या विधानसभा अधिवेशनात बाबूश यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर तिसऱयाच दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या कामकाजादरम्यान ते अनेकांच्या संपर्कात आले होते. शुक्रवारी त्यांनी आपणास कोरोनाची बाधा झाल्याचे जाहीर केल्यामुळे आमदार, मंत्र्यांमध्ये खळबळ माजली. त्यानंतर लगेचच विधानसभा सचिवांनी सर्वांनी कोरोनाचाचणी करून घेण्याचा आदेश जारी केला व त्यानुसार बहुतेकांनी चाचणी करूनही घेतली. त्यापैकी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मंत्री गोविंद गावडे यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, काल रविवारी दिवसभरात संपूर्ण विधानसभा प्रकल्पाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.









