वार्ताहर / कास :
दिवाळीच्या सुट्टयांचे निमित्त साधत पर्यटकांनी मिनी काश्मीर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या तापोळा, बामणोली, मुनावळे, शेबंडी मठ येथील पर्यटनस्थळांवर गर्दी केली असून, शिवसागर जलाशयातील बोटींगसह वासोटा ट्रेकिंगचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत.
सलग मिळालेल्या सुट्टयांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी चोहोबाजुनी हिरव्यागार डोंगररांगांनी सजलेल्या शिवसागर जलाशयातील निळशार पाण्याच्या लाटेवर बोटीतुन प्रवास करणे म्हणजे एक वेगळाच आनंद. त्यातच सातारा, रत्नागिरी जिल्हय़ाच्या हद्दीवरील उंच डोंगरावर घनदाट जंगलात असणारा शिवरायांचा वासोटा किल्ला, शिवशंकराचे नागेश्वर मंदिर, चकदेव म्हणजे ट्रेकर्ससाठी वेगळी पर्वणीच असुन या पर्यटस्थळांवर निसर्गासह येथील पारंपरिक नैसर्गिक खजिन्यांचा आंनद लुटण्यासाठी पर्यटकांचा वाढता ओघ दिसत असल्याने व जलाशयातील बोटींगचा आंनद लुटण्यासाठी बामणोली, तापोळा, मुनावळे व विनायकनगर मठ येथील बोटींग क्लबवर गर्दी होताना दिसत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन पर्यटन व्यवसाय सुरु झाल्याने आणि दिवाळीत पर्यटकांचा कल तापोळा, बामणोलीकडे वाढल्याने येथील अडचणीत आलेल्या व्यवसायिक काहीसा सुखावल्याचे दिसुन येत आहे.









