‘वो लडकी है कहां’चा फर्स्ट लुक
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि ‘स्कॅम 1992’ वेबसीरिजमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता प्रतीक गांधी यांचा आगामी चित्रपट ‘वो लडकी है कहां’चा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रतीक आणि तापसी यांची जोडी पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्स आणि रॉय कपूर फिल्म्स मिळून करत आहेत.
‘वो लडकी है कहां’ हा एक कॉमेडी-ड्रामा धाटणीचा चित्रपट आहे. यात तापसीने एक पोलीस अधिकारी तर प्रतीक एक पारंपरिक कट्टरवादी विचारसरणी असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसून येईल. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या जयपूरमध्ये सुरू आहे. याचे दिग्दर्शन अरशद सैयद करत आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे.
तापसी अलिकडेच ऑनलाईन प्रदर्शित झालेल्या ‘रश्मि रॉकेट’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिचे मोठय़ा प्रमाणावर कौतुक झाले होते. ‘वो लडकी है कहां’सोबत तापसी लवकरच लूप लपेटा, दोबारा, शाबाश मिथू आणि ब्लर या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. तर प्रतीक गांधी ‘डेढ बीघा जमीन’ या चित्रपटात काम करत आहे.









