मराठी साहित्याच्या तथाकथित म्हणता येईल अशा विश्वात स्वतः हलाखीचे जीवन जगतानाही माणसांच्या दुःखाची-वेदनेची कहाणी लिहिणारे वैश्विक साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांची अखेर झाली. राज्य सरकारचे पुरस्कार, ‘झुलवा’कार म्हणून असलेली ख्याती, त्यावरच आधारित व्य्ाावसायिक रंगभूमीवर गाजलेले नाटक, भस्म कादंबरीवर आलेला त्याच नावाचा गाजलेला चित्रपट, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, चिपाड, इंजाळ, झावळ, शेवंती, लांबलेल्या सावल्या अशा 16 गाजलेल्या कादंबऱया. ‘आंदण’ कथासंग्रहास साहित्य परिषदेचा तर काटय़ावरची पोटं या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. पिंड, माती आणि माणसं हे कथासंग्रहही गाजले. तरीही ‘झुलवा’कार हीच त्यांची आयुष्यभराची ओळख ठरली. यल्लम्माला सोडलेल्या जोगतिणीचे बंड त्यांनी जगासमोर आणले. त्यातून समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत झाली. अनेक जोगतिणींचे आयुष्य बदलले. पण, हा विषय मांडणाऱया लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यात काय बदल झाला, या प्रश्नाला उत्तर नाही! महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आणि आंतरराष्ट्रीय स्मारक समितीचे मार्गदर्शक असलेल्या उत्तम बंडु तुपे यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा अत्यंत हलाखीत गेला. पती-पत्नी दोघांनाही अर्धांगवायुचा झटका, सहा हजाराची तोकडी पेन्शन आणि औषधोपचारात होणारा सर्व खर्च, रहायलाही जागा नाही अशा स्थितीत पत्र्याच्या घरात, पलंगाला टेकून हा लेखक जगाच्या वेदना मांडत राहिला. विविध साहित्य संस्था, संमेलनांमधून मिळालेले पुरस्कार तिजोरीत बंद करून किंवा पत्र्याच्या खोलीतील भिंतीवर टांगून ते आपले आयुष्य जगत होते. साहित्यिकाला त्याची स्वतःची एक जागा असावी, त्याची एक खोली असावी, वातावरण प्रसन्न असावे, खिडकी उघडली की नव्या जगाचा अनुभव यावा वगैरे सगळय़ा कल्पना त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत नगण्य होत्या. दोन खोल्यांचा संसार, त्यात मिळेल त्या जागेत लिहायला बसणारा आणि तिथून उठले तर दारात, चौकटीत बसणारा हा लेखक कधी थांबला नाही. ज्याच्याकडे सांगण्यासारखे काही आहे, त्याला बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नसते असे त्यांचे सांगणे. मराठी साहित्याला एकापेक्षा एक सुंदर शब्द दिले म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मराठी सारस्वताला प्रचंड कौतुक आहे. ते असलेच पाहिजे. पण, त्यांच्या बरोबरीनेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनीही मराठी साहित्याला शब्दांच्याबाबतीत समृद्ध केले. त्यांच्याच साहित्यातून प्रेरणा घेऊन लिहायला लागलेल्या उत्तम बंडु तुपे यांनीही मराठीला अनेक नवे शब्द दिले. कारण त्यांचे शब्द हे साहित्यात येण्यापूर्वी माणसांच्या जगण्यात आले होते आणि माणसांचे जगणे लिहिल्याने ते साहित्यात आले होते. म्हणजे खऱया अर्थाने साहित्य नावाचे जे काही विश्व आहे त्या विश्वाला एका तिसऱया जगात किंवा सातव्या पाताळात लपलेल्या विश्वाचे शब्द उत्तम बंडू तुपे यांनी भेट दिले होते. ते शब्द त्यांना काही खोदून काढावे लागले नाहीत. त्या पाताळातलेच आयुष्य त्यांच्या वाटय़ाला आले होते आणि त्या आयुष्यात गुंतून न पडता, त्याचे रडगाणे न करता त्यांनी त्यातील अस्सलपणा, वास्तव जगासमोर आणले. ते जग बदलण्याच्या प्रेरणेने. या साहित्याला तुम्ही दलित साहित्य म्हणू शकत नाही आणि ग्रामीण साहित्यही म्हणू शकत नाही. पण, त्याला तुम्ही माणसांचे साहित्य नक्की म्हणू शकता. त्याच्यासाठी जर व्याख्याच बनवायची झाली तर ती वैश्विक असावी लागेल. तिला क्षुद्र कुंपणात अडकवून ठेवता येणार नाही. उत्तम बंडू तुपे यांनी स्त्रियांचे प्रश्न मांडले, खेडय़ातल्या जीवनाची दाहकता मांडली, मातीचे आणि मातीतल्या माणसांच्या ऱहासाचे अभ्यासपूर्ण वर्णन केले. एक साहित्यिक म्हणून त्यांनी जसे जगणे अपेक्षित होते त्याहून समृद्ध ते जगले. पण, साहित्यिकाच्या जगण्यासाठी जे वातावरण समाजाने आणि शासनाने निर्माण केले पाहिजे तसे वातावरण त्यांच्या भोवती निर्माण व्हावे यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत हे दुर्दैव. अर्थात हे काही त्यांच्या एकटय़ाचे दुर्दैव नव्हतेच. जगाच्या जगण्याचा प्रश्न मांडणाऱयाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण करण्यास शासन, साहित्य उपयोगात येत नसेल तर ते कसले साहित्य आणि ती कसली संस्कृती? महाराष्ट्र हा बुद्धिवाद्यांचा देश असल्याचा जयघोष हीरक महोत्सवात केला जाताना माणसांच्या जगण्याबद्दल मूलभूत लिहिणाऱया, चिंतन प्रक्रियेतून माणूस उलगडून दाखविणाऱया आणि त्या माणसालाच जगण्याचे बळ देणाऱयाला आपण काय दिले याचा साहित्य विश्वाने एकदा शांतपणाने विचार करावा आणि वेळ मिळालाच तर उत्तम बंडू तुपे यांची जाहीर नाहीतर किमान मनोमन तरी माफी मागावी! आजचा काळ असा आहे की, घरबसल्या ‘टिक टॉक’ करून एखादी अभिनेत्री समाजाला कसे जगायचे याचा संदेश देते. साबणाने हात स्वच्छ धुऊन घ्या या तिच्या आवाहनाचेही कोडकौतुक होते. पण, जोगतिणीचे आयुष्य झुगारून द्या असे आवाहन करणाऱयाला, अनेकांचे आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरलेल्याला साधे घर मागण्यासाठी मंत्रालयाच्या दारात उभे रहावे लागते आणि फडतुस कारकुनाकडून अपमान झाला म्हणून वीस वर्षे घराचे स्वप्न उरातच दाबावे लागते. कधीतरी संपत मोरे, देशपांडेंसारख्या पुण्यातल्या नव्या विचाराच्या पत्रकारांना त्यांचे दुःख मांडावेसे वाटते. पण ज्या घरात सहचारिणीही नसणार असे सरकारी घर लाभले तरी त्या व्यक्तीला आनंद मिळाला असेल का, याचा विचारही नको! काळच इतका वाईट की, वृत्तवाहिन्यांवर जगात कुठे किती मेले याचे मीटर चालू आहे. मिनिटा मिनिटाला मृत्यूचा आकडा बदलत आहे. त्यात एक उत्तम बंडू तुपेंचे निधन झाले. तापल्या वाळूच्या डोंगरांमध्ये वादळ उठले आणि त्यात एक हीरा पडला तर? वाळू चकाकली की हीरा चकाकला? तापत्या वाळूखाली हीरा दडपला की दगड? हे कोण कुणाला सांगणार? त्याला वर काढायला वादळ झुगारून कोण तापत्या वाळूत हात घालणार? असो, महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवात राहिलेले हीरे तरी शोधा..त्यांना तरी जपा..!
Previous Articleमोरूचे मित्र
Next Article पुणे विभागात 1 हजार 457 रुग्ण; आतापर्यंत 88 मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








