पावसामुळे दैना : व्यापारी, खरेदीदार, शेतकरी वैतागले : एपीएमसीमध्येच मार्केट सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले. त्यानंतर भाजीमार्केट शहराच्या विविध भागांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. मात्र, स्थलांतरित केलेल्या या भाजीमार्केटमध्ये कोणत्याच प्रकारची सोय नसल्यामुळे व्यावसायिकांना आणि खरेदीदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातच आता मान्सूनला सुरुवात झाली आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे तात्पुरत्या भाजीमार्केटमध्ये सर्वत्र दलदल निर्माण झाली होती. यामुळे व्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी वैतागले होते.
बेळगावचे भाजीमार्केट हे महत्त्वाचे भाजीमार्केट म्हणून ओळखले जाते. कारण येथून गोवा, महाराष्ट्र या राज्यांना भाजी पुरवठा केला जातो. भाजी विक्रीसाठीही बेळगाव जिल्हय़ातील गोकाक, रायबाग, बैलहोंगल, चिकोडी या परिसरातील शेतकरी बेळगावकडेच येत असतात. बेळगाव तालुक्मयामध्येही मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे बेळगाव तालुक्मयातील शेतकरी तर मोठय़ा प्रमाणात आपला भाजीपाला पुरवठा करत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
सोयी नसल्यामुळे समस्या
कोरोनामुळे सीपीएड मैदान, आरटीओ मैदानावर भाजी खरेदी-विक्री सुरू आहे. मात्र, त्या ठिकाणी रस्ते तसेच ये-जा करण्यासाठी कोणतीच सोय नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. वाहनांची वर्दळही मोठी असते. त्यामुळे या रिपरिप पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. येथील समस्या पाहून एपीएमसीमध्येच भाजी विक्री-खरेदीसाठी मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.
सध्या तयार करण्यात आलेले तात्पुरते भाजीमार्केट हे केवळ पत्रे घालून उभारण्यात आले आहे. त्यामुळे गाळय़ांमध्येच पाऊस पडत आहे. पावसामुळे भाजीपाला भिजून जात आहे. त्यामुळे भाजीपाला खराब होत आहे. भाजी विक्री लवकर झाली नाही तर त्याचा मोठा फटका बसत आहे. तेव्हा ही समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.









