विधानपरिषद सदस्यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / बेंगळूर
विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्यात तातडीने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील सदस्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. बुधवारी समग्र शिक्षण-कर्नाटक सभागृहात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याने आयोजिलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
शाळा बंद असल्याने ग्रामीण भागात विशेष करून सरकारी शाळांमधील मुलांची शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेतील सातत्यता हरवली आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात बारावी आणि दहावीचे वर्ग सुरू करावेत. शाळा सुरू केल्यास विनाअनुदान तत्वावर सेवा बजावणाऱया शिक्षकांसमोरील वेतनाची अडचण दूर होईल, असे मत विधानपरिषद सदस्यांनी व्यक्त केले.
मुले दीर्घकाळ शाळेपासून दूर राहिल्याने त्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे त्वरित शाळा सुरू करणे योग्य असल्याचे विधानपरिषद सदस्यांनी सांगितले आहे. ‘विद्यागम’ कार्यक्रम स्थगित करणे योग्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना फटका बसला आहे. त्यामुळे विद्यागम कार्यक्रमाला पुन्हा चालना द्यावी. शाळा सुरू झाल्यानंतर मिळणाऱया कालावधीचा विचार करून अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सामाजिक अंतर राखून विविध टप्प्यात वर्ग घ्यावेत. त्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात यावी. प्रसारमाध्यमांचे वृत्त बाजुला ठेवून मुलांच्या हिताचे निर्णय घेणे उचित ठरेल, असे मतही विधानपरिषद सदस्यांनी व्यक्त केले आहे.
तांत्रिक सल्लागार समितीचे मत जाणून घेणार
सर्व विधानपरिषद सदस्यांची मते जाणून घेतली आहेत. याबबात राज्य कोविड तांत्रिक सल्लागार समितीचे मत जाणून घेऊन दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल. शाळा सुरू झाल्यानंतर पदवीपूर्व विभागाचा अभ्यासक्रम एनसीईआरटीने सूचविल्याप्रमाणे कपात करण्यात येईल.
– एस. सुरेशकुमार, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री









