ऑनलाईन टीम / पुणे :
दैनंदिन जीवनातील ताण-तणावाच्या निराकरणासाठी खेळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे दिनांक ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ‘अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देऊन डॉ. म्हैसेकर म्हणाले, निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण खेळाची आवड अंगीकारायला हवी. प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त राहिल्यास कार्यालयीन कामकाजात देखील सकारात्मक बदल होऊ शकतात, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास दिल्ली बोर्डाचे रवींद्र देव तसेच महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राजीव बोडस, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तथा जिमखाना सचिवालयाचे सभापती राजेंद्र पवार तसेच उपसभापती अनंत सावंत उपस्थित होते.









