मुसळधार पावसाचा इशारा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘तौत्के’ चक्रीवादळ समुद्रमार्गे शनिवारी कोकण किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आह़े चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोकण विभागामध्ये 15 व 16 मे रोजी 60 ते 70 कि. मी. वेगाने वारे वाहणार आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आह़े
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांबरोबरच उत्तर कोकणातीत रायगड, मुंबई, ठाणे व पालघर जिह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यापासून बचावासाठी खबरदारी घ्याव़ी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आह़े लक्षद्वीप व सभोवताली अरबी समुद्रात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 15 मे रोजी पहाटे चक्रीवादळात रुपांतर होणार असून ते अधिक तीव्र होऊन उत्तर-वायव्येकडे गुजरात व पाकिस्तान किनारपट्टीकडे सरकरणार आहे. ते 18 मे रोजी सकाळी गुजरात किनारपट्टी जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचना
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 16 मे 2021 रोजी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्वतःचे कुटुंब तसेच जनावरांची सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी. घराला धोका संभवत असलेली झाडे किंवा फांद्या काढून टाकाव्या, पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त साठा करून ठेवावा. बॅटरी, मोबाईल चार्ज करून ठेवावेत. कच्चे घर, विद्युत खांब, आणि झाडाखाली थांबू नये, असे सांगण्यात आले आहे.
पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिके उघडय़ावर ठेवू नये. नवीन लागवड केलेल्या झाडे, पिकांना काठीचा आधार द्यावा. सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाच्या शक्यतेने फवारणी आणि खतांची मात्रा, पेरणीची कामे पुढे ढकलावी, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. गोठय़ाची डागडुगी करून घ्यावी. वाऱयाच्या अंदाज घेऊन जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. जनावरांचे खाद्य सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे, जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावी, चरावयास सोडू नये, असा सावधानीचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आह़े









