आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातुन जाणारा रा.मार्ग क्रमांक १५१ वरील आरवडे ते दिघंची या हायवेच्या कामाबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ४०० मिटरचा काँक्रीट रस्ता दिघंचीत करण्यात आला आहे. ३३ हजार के.व्ही. क्षमतेची विद्युत केबल, महावितरणचे सबस्टेशनचा प्रश्न आणि दिघंचीतील टी जंक्शन यामुळे या रस्त्यात बदल केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुभाष पाटील यांनी दिली.
मागील काही दिवसांपासुन आटपाडीतील रस्ता गायब करून तो दिघंचीत केल्याचा आरोप अनिल पाटील यांनी करत आंदोलन केले होते. बांधकाम विभागावर त्यांनी आक्षेप घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपअभियंता सुभाष पाटील यांनी भूमिका मांडली.
रा.मा क्रमांक १५१ वरील किलो मिटर ११७/१०० ते ११७/५०० या लांबीमध्ये उजव्या बाजुस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. यांचे सबस्टेशन असुन दोन मोठे ट्रान्स्फॉर्मर व विद्युत वाहिन्या असून रस्त्याच्या डाव्या बाजुस ३३००० के.व्ही. क्षमतेची विद्युत केबल आहे. त्यामुळे या दोन्ही स्थलांतरण करणे अतिशय अवघड आणि खर्चिक असल्याचे सवलत कारामार्फत अवगत करण्यात आली होती. तर दिघंची येथे मल्हारपेठ ते पंढरपूर हा रस्ता आटपाडीतुन जाणाऱ्या रस्त्याला मिळतो, तेथे टी जंक्शन होत असल्याने हा बदल करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले.