अमेझॉन प्राइम व्हिडिओ संकटात
‘तांडव’ या वेबसीरिजच्या वादाची झळ आता मनोज वाजपेयी यांचा शो ‘द फॅमिली मॅन-2’पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी याचा ट्रेलर सादर होणार होता. परंतु निर्माते आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओने तो लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ‘तांडव’ हा अमेझॉन प्राइमचाच शो असल्याने पत्रकार परिषदेत यासंबंधी प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते. याचमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
दिग्दर्शकाशी निर्मात्यांशी चर्चा
वादामुळे अली अब्बास जफर आणि अमेझॉन प्राइम ओरिजिनल कंटेंट प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. सोमवारी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या जनसंपर्क प्रमुख सोनिया हूरिया यांनी माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱयांशी फोनवरुन चर्चा केली आहे. परंतु यातून काय निष्पन्न झाले हे अद्याप स्पष्ट नाही.
स्पष्टीकरणाचे संकट
तांडव प्रकरणी नेमके कुठले स्पष्टीकरण द्यावे यासंबंधी अमेझॉन प्राइम प्रमुख गोंधळात आहेत. यापूर्वी ‘मिर्झापूर-2’वर शहराची प्रतिमा मलीन करण्याचा आणि ‘पाताल लोक’वर धार्मिक श्रद्धांना ठेच पोहोचविल्याचा आरोप झाला होता. परंतु ते वाद फारकाळ टिकले नव्हते. तसेच निर्मात्यांना दृश्ये बदलावी लागली नव्हती. परंतु यंदा मात्र हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.









