नागरिकांची गैरसोय, सात-बारासाठी हेलपाटे,
बेळगाव / प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेला वेळेत उतारे मिळावे, यासाठी बेळगाव तहसीलदार कार्यालयासह शहराच्या इतर ठिकाणी जनस्नेही केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र जुन्या तहसीलदार कार्यालयातील जनस्नेही केंद्र सातत्याने बंद राहत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. शुक्रवारी जनस्नेही केंद्र बंद राहिल्याने नागरिकांना उताऱयाविणा माघारी परतावे लागले. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
पीक कर्ज, कृषी अनुदान, अवजारे, बि-बियाणे, खते वाटप, जमीन खरेदी-विक्री, शासनाच्या शेतीसंबंधी योजना शासकीय कामासाठी सात-बारा महत्त्वाचा आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता जनस्नेही केंद्र बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय झाली. परिणामी नागरिकांना उतारा मिळविण्यासाठी इतरत्र असलेल्या जनस्नेही केंद्राकडे परतावे लागले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासह इतर कामासाठी लागणाऱया सात बारा उताऱयांची पूर्तता केली जाते. मात्र नागरिकांना वेळेत उतारे मिळत नसल्याने पुढील कामे करताना अडचणी येत आहेत. सांबरा, काकती, उचगाव, एपीएमसी, मार्केट यार्ड आदी ठिकाणी जनस्नेही केंद्रे आहेत. मात्र सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणी पुढे करून ही केंदे बंद ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे जनस्नेही केंद्रातील काम सुरळीतपणे सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.









