वार्ताहर/ उचगाव
बेळगाव तालुक्याचे तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी तालुक्यात 19 परीक्षा केंद्रांवर सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी परीक्षा केंद्रांवर सुरळीत सुरू असलेल्या परीक्षेबाबत समाधान व्यक्त केले. आणि सर्व केंद्र प्रमुख तसेच पर्यवेक्षकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील सर्व केंद्रांवर शनिवारी गणित विषयाचा पेपर सुरळीत पार पडला.
कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांवर संकट ओढवले. तब्बल तीन महिने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी वर्गातील अभ्यासाचा जोश, केलेले पाठांतर बहुतांश विसरल्याने व परीक्षेचीच ओढ कमी झाल्याने याचा मोठा परिणाम परीक्षा पेपरवर दिसून येत असल्याचे मत अनेक पर्यवेक्षकांनी नोंदविले आहे. मात्र, शिक्षण खात्याने अखेर परीक्षा घेण्याचेच ठरविल्याने त्याला सामोरे जाण्याशिवाय विद्यार्थी वर्गाला पर्यायच उरला नाही.
तालुक्यात सुरू असलेल्या परीक्षा केंद्रांना संबंधित अधिकारी वर्ग भेटी देऊन काळजीपूर्वक निरीक्षण करताहेत. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने विद्यार्थ्याची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी, त्यांची सुरक्षितता पाहण्यासाठी अधिकारी वर्ग, नर्स, आशा कार्यकर्त्या, स्काऊट ऍण्ड गाईड, फिजिकल इन्स्ट्रक्टर, केंद्र प्रमुख यांना आवर्जुन सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्क्रिनिंग, कोणालाही स्पर्श करू देऊ नका, याबाबतच्या सूचना करत सर्वांनी आपले आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.
पालक वर्गाकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली दहावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण खाते, शासन प्रयत्नशील आहे. मात्र, परीक्षा केंद्राबाहेर सकाळी पेपर सुरू होण्याच्यावेळी होत असलेली गर्दी सुद्धा सतावत असून चिंतेचा विषय बनत आहे. यामध्ये 50 टक्के पालक मास्क वापरत नसल्याचे आढळून येत आहे. शिवाय परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करेपर्यंत विद्यार्थी-पालक तसेच इतर युवक जाणुनबुजून मनात काही हेतूने थांबणाऱयांमुळे गर्दी वाढत आहे. सोशल डिस्टन्स ठेवत नसल्याने ही धोक्याची घंटा असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारच्या सुटीनंतर सोमवारी विज्ञान विषयाचा पेपर होणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1.45 पर्यंत पेपरला वेळ आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी येण्याअगोदर व परीक्षा संपल्यानंतर संपूर्ण वर्गाची स्वच्छता करून वर्गामध्ये सॅनिटायझरची फवारणी करून स्वच्छता करण्यात येत आहे.









