बेळगाव / प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेला वेळेत उतारे मिळावेत, यासाठी बेळगाव तहसीलदार कार्यालयासह शहराच्या इतर ठिकाणी जनस्नेही केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र जुन्या तहसीलदार कार्यालयातील उतारा केंद्र शुक्रवारी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना उताऱयाविना माघारी परतावे लागले. सातत्याने या त्या कारणाने हे केंद्र बंदच राहत असल्याने नागरिकांना फटका बसत आहे.
पीक कर्ज, कृषी अनुदान, अवजारे, बी-बियाणे, खते वाटप, जमीन खरेदी-विक्री, शासनाच्या शेतीसंबंधी योजना आदी कारणांसाठी शेतकऱयांना सातबारा महत्त्वाचा आहे. मात्र उतारा केंद्र शुक्रवारी बंद होते. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागले.
जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसाचा फटका शेतीला बसला आहे. सोयाबिन व बटाटा बियाणे कुजल्याने बटाटा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाईसाठी अर्ज करण्यासाठी सातबारा गरजेचा आहे. केंद्रातून वेळेत सात-बारा उतारा मिळत नसल्यामुळे शेतकऱयांसमोर अडचणी निर्माण होत आहे. जुन्या तहसीलदार कार्यालयातील जनस्नेही केंद्राच्या खिडकीवर केंद्र बंद ठेवण्यात आल्याचे सूचनापत्रक लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे तातडीने उतारा केंद्र सुरळीत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.









