कारवाई करण्याची तालिबानला सूचना
पाकिस्तानच्या कबायली (विविध टोळय़ा) भागांमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात भीषण हल्ले करणाऱया तहरीक-ए-तालिबानचे (टीटीपी) दहशतवादी अफगाण तालिबानी नेत्यांसोबत दिसून आल्याने पाकिस्तान संतप्त झाला आहे. अफगाणिस्तानात सत्तेवर येत असलेल्या तालिबानी नेत्यांना प्रतिबंधित टीटीपी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगू असे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
टीटीपीकडून अफगाणच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याचा मुद्दा अफगाणिस्तानमधील पूर्वीच्या सरकारसमोर पाकिस्तान उपस्थित करत राहिला आहे. आगामी काळातही अफगाणिस्तानातील नव्या राजवटीसमोर हा मुद्दा मांडण्यात येईल. टीटीपीला अफगाणिस्तानात पाकिस्तान विरोधी कारवायांसाठी स्थान मिळू नये असा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
टीटीपी नेत्याची मुक्तता
पाकिस्तानात प्रतिबंधित टीटीपीच्या नेत्यांपैकी एक असलेल्या मौलवी फकीर मोहम्मदची तालिबानकडून मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयाला पाकिस्तानने विरोध दर्शविला आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी तालिबानला त्याच्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. अफगाण भूमीचा वापर अन्य कुठल्याच देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी होऊ देऊ नये अशी मागणी त्यांनी तालिबानसमोर केली आहे. पाकिस्तानने अद्याप तालिबानच्या राजवटीला अधिकृत मान्यता दिलेली नाही.









