चीनला चारही बाजूंनी घेरण्याची रणनीती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तवांगमधील यांगत्से येथे भारताची चेकपोस्ट हटवण्यासाठी आलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सुमारे 300 सैनिकांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल अमेरिकेने भारताचे कौतुक करत पाठिंबा व्यक्त केला आहे. भारताची आक्रमक वृत्ती पाहून चीनला चांगलीच अद्दल घडल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. चीनला वारंवार इतरांच्या कुरापती काढण्याची सवयच आहे. तरीही भारताकडून तवांगमध्ये चोख प्रत्युत्तर मिळताच चिनी सैनिकांनी माघार घेत सावधपणे कारवाई केली, अन्यथा चीनला मोठी किंमत चुकवावी लागली असती, असे अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रेस सेपेटरी पॅट रायडर म्हणाले.
तवांग झटापटीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तवांगमध्ये जे घडले त्यावरून चीनचे आक्रमक धोरण दिसून येते, असे रायडर म्हणाले. तसेच भारताच्या संयम आणि समजूतदारपणाचे कौतुक करत ‘भारत या दिशेने जे काही करत आहे आणि ज्याप्रकारे परिस्थिती हाताळत आहे ते खरोखर प्रशंसनीय आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. तवांग घटनेवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही मोठे वक्तव्य केले आहे. भारत नक्कीच अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार असून आम्ही आमच्या दुतावास आणि परराष्ट्र विभागाच्या माध्यमातून या परिस्थितीवर भारताशी जवळच्या संपर्कात आहोत, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस म्हणाले. तसेच चीनने जर एलएसीची स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला किंवा लष्करी किंवा नागरी मार्गाने घुसखोरी करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका त्याला विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भारत आणि चीनने परस्पर संवादाद्वारे विवादित सीमांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंद-पॅसिफिक महासागरातील चीनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिका भारताला आपल्या रणनीतीचा शिल्पकार मानते हे लक्षात ठेवा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. समुद्रातील चीनच्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची चतुर्भुज आघाडीही तयार झाली आहे.









