प्रतिनिधी/ पणजी
तळागाळातील लोकांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे आणि गरीबी असल्यामुळे तसेच त्यांना बँक किंवा वित्त संस्था यांच्याकडून हवे तसे आर्थिक साहाय्य मिळत नाही. म्हणून ते आपापल्या क्षेत्रात अग्रणी असूनही चमक दाखवू शकत नाहीत, अशी खंत डॉ. क्षमा फर्नांडिस यांनी प्रकट केली. त्यांचे सशक्तीकरण व्हावे म्हणून आपण स्वतः कार्य करीत असून इतरांनी देखील ते करावे, असेही त्यांनी सूचवले.
आर्थिक सुबत्ता आणि सलोखा त्यासाठी आवश्यक या दोन्ही गोष्टी समतोलाने पुढे गेल्या तर हे चित्र पालटू शकते, अशी आशा त्यांनी वर्तवली.
तळागाळातील लोकांना स्टार करण्यासाठी…
पणजीतील कला अकादमी येथे डॉ. डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात तिसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ‘तळागाळातील लोकांना स्टार करण्यासाठी त्यांचे सशक्तीकरण झाले पाहिजे’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले आणि आपले अनेक अनुभवही कथन केले. गुढी – पारोडा येथील मूळ गोमंतकीय असलेल्या क्षमा फर्नांडिस सध्या नॉर्दर्न ऑफ कॅपिटल या देशातील आघाडीच्या वित्त कंपनीच्या सीईओ आहेत.
बँकांनी, खासगी वित्त संस्थांनी मदत करावी
देशाच्या विविध भागात तसेच गावातून विविध क्षेत्रात प्रगती करणारे अनेकजण असतात आणि आहेत. गरीबी असल्याने किंवा पुरेसे पैसे नसल्याने तसेच ते मिळतही नाहीत म्हणून ते पुढे येऊ शकत नाहीत आणि रॉकस्टार होऊ शकत नाहीत ही परिस्थिती त्यांनी विषद केली. त्याची उदाहरणेही दिली. खासगी – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी तसेच विविध वित्त संस्थांनी याची दखल घेऊन त्या लोकांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घ्यावा, प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. फर्नांडिस यांनी केले.
शहरातील कर्जदार परतफेड करत नाहीत
अनेक गावातून अर्थसाहाय्याच्या साधन – सुविधा आता उपलब्ध होत आहेत परंतु बहुतेक ग्रामीण भागातील गावे त्यापासून आजही वंचित आहेत. अनेकांना गरीबीतून दिवस काढावे लागतात. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गावातील लोकही आता कर्जाची सुविधा घेतात आणि त्याची योग्य ती परतफेडही करतात, असा दवा डॉ. फर्नांडिस यांनी केला. शहरातील मोठे कर्जदार मात्र कर्जाची योग्य ती परतफेड करत नाहीत. त्यासाठी मग नोटीसा पाठवणे असले प्रकार वसुलीसाठी करावे लागतात, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱयांसाठी कृषी कर्ज व इतर अनेक सरकारी योजना आहेत परंतु त्यांची पुरेशी माहिती त्यांना नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या आत्महत्या चटका लावणाऱया आहेत. अनेकदा पीक विविध करणाने वाया जाते व मोठे नुकसान होते, असेही त्यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.









