देशभरातील कामगारांना महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र पुन्हा एकदा खुणावू लागले आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्हय़ात आणि मोठय़ा औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांनी कामाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशसह देशाच्या कानाकोपऱयातून कामगार महाराष्ट्रात परतू लागले आहेत. प्रारंभीच्या टप्प्यात उद्योजकांनी काही कामगारांना अगदी त्यांच्या गावापर्यंत गाडय़ा पाठवून परत आणले होते. आता रेल्वेच्या माध्यमातून हे कामगार परत येऊ लागले आहेत. एका अर्थाने तळहातावर प्राण घेऊनच हे लोक महाराष्ट्रात येत आहेत. उद्योगक्षेत्राचे मोठय़ा प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले वगैरे म्हणणाऱयांना यातून एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की, कुशल आणि अकुशल स्वरूपाचे कामगार ही आजही देशातील उद्योगक्षेत्राची मोठी गरज आहे आणि त्यांच्याशिवाय देशातील कोणत्याही उद्योगाची प्रगती, भरभराट आणि उत्पादन अगदी आजच्या काळातही संपूर्णतः शक्य नाही. परतणाऱया कामगारांमध्ये सर्वाधिक आकडा हा योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशचा आहे. त्या खालोखाल नितीशकुमारशासित बिहारमधून लोक महाराष्ट्रात येत आहेत. कोरोनाच्या संकटाचा गवगवा झाला आणि एक महिना कसातरी कड काढल्यानंतर देशभरातील कामगार आपापल्या गावाला परतू लागले तेव्हा महाराष्ट्रातील विशेषतः उत्तर भारतीय कामगारांना दम निघणे मुश्किल झाले होते. पंतप्रधान आता आपल्या गावाला परत जाण्यासाठी गाडी सुरू करतील अशी आशा वाटलेले लोक गुजरातच्या सुरतेत आणि मुंबईतील बांद्रा रेल्वे स्थानकावर जमले आणि त्यांनी मोठाच गहजब केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने तिथे झालेल्या गर्दीचा जगभर गवगवा झाला. या दरम्यान मिळेल त्या वाहनात मेंढरासारखे केंबून शेकडो कामगारांनी गाव सोडले. हजारो लोक चालतच निघाले. त्यातून औरंगाबादजवळ रेल्वे रूळावर भयानक दुर्घटनाही घडली. दमछाक, उपासमारीने चालता चालता अनेकांनी प्राण सोडले. दिल्लीहून हरियाणाला आपल्या आजारी पित्याला घेऊन एक चिमुरडी सायकलवरून निघाली. तिच्या या धाडसाचे कौतुक झाले. क्रीडा संस्थांनी तिला दत्तक घ्यायच्याही घोषणा केल्या. पण, मला फक्त शिकायचे आहे असा निर्धार त्या चिमुरडीने व्यक्त केला. देशातील गरीब आणि कामगारांची झालेली ही परवड फाळणीनंतरची सर्वात मोठी परवड होती. डोळय़ात अश्रू आणि पोटात भूक घेऊन गावाकडे गेलेल्या या लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यांनी सहजपणे स्वीकारलेही नाही. अनेक ठिकाणी हजारो लोकांच्या रांगा रस्त्यावर लागून राहिल्या. कोरोनाचे संकट तर संपूर्ण जगात होते. तेव्हा त्यातून त्यांचे गाव तरी कसे सुटणार होते? भारतभरचा प्रवास करून आपले स्वकीय पुन्हा गावाकडे येत आहेत म्हटल्यानंतर जिवाच्या भीतीने अनेकांनी आपले गाव, घर सोडून पलायन केले. आता गावात वर्षानुवर्षे राहून वडिलोपार्जित किडूकमिडूक सांभाळून ठेवणारे आणि गाव सोडून जगण्यासाठी बाहेर पडलेले यांचा गावागावात संघर्ष सुरू झाला. असा संघर्ष तर मुंबई सोडून आपल्या गावात आलेल्या मराठी माणसांचाही सुरू आहे. कोकणात असो की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात! सगळीकडे या वडिलोपार्जित इस्टेटीने म्हणजेच ज्यात फारसे उगवत नाही आणि उगवले तरी संपूर्ण कुटुंबाचे जगणे त्यातून घडू शकत नाही अशा जमिनीसाठी वाद सुरू झाला आहे. कुणाला ही जमीन विकून शहरात छोटा उद्योग सुरू करायला भांडवल हवे आहे, तर शेतातच कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱयाच्या पत्नीला तेच शेत आपल्या चिमुरडय़ांच्या आणि म्हाताऱया सासू सासऱयांसह स्वतःच्या चरितार्थासाठी जपायचे आहे. पण, या शेतावर आता हक्क सांगणारे परत आले आहेत. प्रश्न दोघांच्याही जगण्या मरण्याचा आहे आणि प्रत्येकाला आहे तीच जमीन आधार वाटते आहे. हा आधार एकाला विकायचा आहे आणि एकाला टिकवायचा आहे. यासाठीच्या संघर्षाने गावांना ग्रासले आहे. घराघरातले हे संघर्ष समाजासमोर यायला अद्याप वेळ असला तरी ते वास्तव काही लपलेले नाही. ही फक्त महाराष्ट्राची नव्हे तर भारतातील प्रत्येक खेडय़ाची कहाणी आहे. आणि यातही संवेदनशील असणारा कष्टकरी वर्ग आता जगण्यासाठी जमीन विकायची की ज्यांचे त्यावर जगणे आहे त्यांना त्याचा आधार देऊन स्वतः शहराची वाट धरायची या विवंचनेत आहे. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ज्यांच्या जमिनी नाहीत त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला जायचा निर्धार केला आणि ते कामाच्या शोधाला लागले. कष्टकऱयांना मागणी ही असतेच. त्यामुळे त्यांचे परतणे आता अटळ झाले. रेल्वेचे बुकिंग फुल्ल होऊ लागले. प्रकृती स्वस्थ असल्याचे दाखले अडीच हजारात देणारे सरकारी दवाखानेही उत्तर भारतात उपटले. आता जगायला जायचे आहे तर मरायची भीती काय बाळगायची असा विचार करून कामगार तळहातावर प्राण घेऊन परतू लागला आहे. त्याच्या येण्याने अस्वस्थ झालेला भूमीपुत्रही आता कामाच्या शोधाला लागला आहे. त्यालाही आपल्या जिवाची भीती असली तरी कुटुंबाच्या भविष्याची चिंताही आहेच. या चिंतेनेच त्याला आता उद्योगनगरींची वाट धरणे गरजेचे बनवले आहे. राज्याच्या सरकारांना अर्थचक्र चालल्याशिवाय आपलीही तिजोरी सशक्त होणार नाही हे माहीत झाल्याने त्यांनीही या उद्योगांना सुरू करायला आणि कोरोनासह सुरक्षित जगण्याला प्राधान्य देण्याला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने भूमीपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी महाजॉब्ससारख्या पोर्टलचे प्रकाशन केले आहे. आता जिवाच्या काळजीवरही जगण्याच्या काळजीने मात केली आहे. कामगार जोपर्यंत राबणार नाही तोपर्यंत उत्पादन होणार नाही आणि ते जोपर्यंत बाजारात येणार नाही तोपर्यंत अनेक क्षेत्रे सुरू होणार नाहीत. ती सुरू झाल्याशिवाय अर्थव्यवस्था धावायला लागणार नाही. हे एक युद्धच आहे आणि युद्धात उतरायला प्राधान्य देणारे जगण्यासाठी मरायचीही तयारी ठेवणारेच असतात. तळहातावर प्राण घेऊन लढायचे हे या सर्वांचे मध्ययुगात-यंत्रयुगातही प्रारब्ध होते आणि विज्ञान युगातल्या संगणक उपयुगातही आहे….! प्राण तळहातावर कायम आहे!
Previous Articleकाय सांगशील?
Next Article चीनमध्ये सापडले ब्यूबॉनिक प्लेगचे रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








