प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यातील तळवडे गावचे पोलीस पाटील आणि प्राणी मित्र यांनी प्रसंगावधान साधून दुर्मीळ असलेल्या खवले मांजर याला जीवदान देण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दोन वर्षाच्या या खवले मांजराला लांजा वनपाल यांच्याकडे स्वाधीन करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
शुक्रवारी रात्री 10 च्या दरम्यान तळवडे-कणगवली रस्त्याशेजारी एक खवले मांजर घाबरलेल्या अवस्थेत तळवडे येथील वैभव कनावजे, सौरभ कनावजे, प्रणय चव्हाण यांना दिसून आले. तळवडे फाटा येथून दुकाने बंद करून घरी जात असताना तिघांना हे खवले मांजर निदर्शनास आले. हा दुर्मीळ प्राणी असल्याने त्यानी पोलीस पाटील प्रदीप उर्प बाबू पाटोळे यांना सांगून खवले मांजर अपघात, वा त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून त्यांच्या ताब्यात दिले.
पोलीस पाटील प्रदीप पाटोळे व सरपंच संजय पाटोळे यांनी वनपाल सागर पताडे यांना या खवले मांजराची माहिती दिली. विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा वनपाल पताडे आणि वनमजुर खेडेकर हे तातडीने तळवडे गावी दाखल झाले.
खवले मांजराला ताब्यात घेऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. वनपाल सागर पाताडे यानी तळवडे पोलीस पाटील व प्राणीमित्रांचे कौतुक केले. जिल्ह्यात दुर्मीळ खवले मांजर यांचे अस्तिव धोक्यात आले असताना तळवडे गावातील घटना दिलासादायक आहे. लांजा वनपाल व वन अधिकारी यांनी खवले मांजर वाचवा या बाबत केलेली जनजागृतीमुळे तळवडे गाव सतर्प असल्याचे सरपंच संजय पाटोळे यांनी सांगितले.