प्रतिनिधी/ बेळगाव
मागील वर्षी बेळगावमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी इमारतींच्या तळमजल्यांमध्ये शिरले होते. तळमजल्यात असणारे वीजमीटर पाण्यात गेल्यामुळे त्या भागातील वीजपुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे धोकाही वाढला होता. यापुढे तळमजल्यात वीजमीटरांना परवानगी देण्यात येणार नसून तळमजल्यात मीटर असलेल्या ग्राहकांना ते पहिल्या मजल्यावर हलविण्यासाठी हेस्कॉमकडून बुधवारपासून नोटिसा देण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्या आदेशानुसार हेस्कॉमकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत.
बेळगाव शहरातील 80 टक्के इमारतींचे वीजमीटर तळमजल्यात आहेत. पहिल्या मजल्यावर जागा वाया जावू नये, यासाठी तळमजल्यात विजेचे मीटर लावण्यात आले आहेत. मागील वषी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे पाणी इमारतींमध्ये शिरले हेते. यामध्ये खासगी ट्रान्स्फॉर्मर, विजेचे मीटर पाण्याखाली गेले होते. त्यामुळे जोवर पाणी कमी होत नाही तोवर वीजपुरवठा सुरू करणे शक्मय नव्हते. सुरू असणाऱया वीजमीटरचा धक्का लागून दुर्घटना घडण्याची शक्मयता असते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने मीटर पहिल्या मजल्यावर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
केईआरसीची नियमावली
कर्नाटक विद्युत नियामक मंडळ (केईआरसी) च्या नियमावलीनुसार सुरक्षित ठिकाणी वीजमीटर असणे गरजेचे आहे. लाईनमन तसेच मीटर रीडिंग करताना ते सहजगत्या दिसले पाहिजे. जमिनीपासून 3 फूट उंच व 7 फुटांपेक्षा खाली मीटर बसविणे आवश्यक आहे. इमारतीमध्ये शिरताना मुख्य द्वाराच्या शेजारीच वीजमीटरचे पॅनेल बसविणे गरजेचे असल्याचा उल्लेख केईआरसीच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आला आहे.
7 दिवसांमध्ये बसवावे लागणार मीटर
पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बुधवारपासून हेस्कॉमने ग्राहकांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. नोटीस दिलेल्या 7 दिवसांच्या आत मीटर पहिल्या मजल्यावर बसवावे लागणार आहे. अन्यथा त्या इमारतीचा वीजपुरवठा तोडण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.









