उंब्रज / प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात अशी सरसेनापती हंबीररावबाजी मोहीते यांची इतिहासात ओळख आहे. बाजी म्हणजे जिवाची बाजी लावणारा आणि ते काम छत्रपतींच्या स्वराज्यात सरसेनापती हंबीरराव मोहीते यांनी केले. सरसेनापतींचे छत्रपतींच्या घराण्याशी नातेसंबंधही राहीले. महाराणी ताराराणी, सोयराबाई या गावच्या म्हणूनच तळबीडला ऐतिहासिक महत्त्व आहे. गावाने ही परपंरा आजही जपली आहे. आपल्याला अभिमान आहे की आपण या शूरवीरांच्या मातीतले आहोत, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व जिल्हाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
तळबीड ता. कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहीते यांना मंगळवारी १६ डिसेंबर रोजी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले. बांगलादेश युध्दातील भारतीय सैन्य दलाच्या विजयाप्रित्यर्थ गेल्या दोन दशकांपासून कराड येथे मोठ्या दिमाखात विजय साजरा केला जातो. विजय दिवस समारोहाचे संयोजक कर्नल संभाजी पाटील यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तळबीड येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी मानवंदना व अभिवादन करण्याची परंपरा गेल्या १२ वर्षापासून सुरू ठेवली आहे.
मात्र, यावर्षी कोरोनामुळे विजयदिवस साजरा करता आला नसला तरी सरसेनापतींना अभिवादन करण्यासाठी विजय दिवस संयोजक टिम व मान्यवर मंगळवारी १६ डिसेंबर रोजी तळबीड येथे उपस्थित राहीले. खासदार पाटील यांनी सरसेनापतींच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कराडच्या नगराध्यक्षा रोहीणीताई शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील, सरपंच जयवंत मोहीते, उपसरपंच लालासाहेब वाघमारे, निवृत्त सुभेदार शामराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने शत्रुला परास्त केले हाच गनिमी कावा बांगलादेश युध्दात भारतीय सैन्य दलाने वापरला. तळबीडच्या सरसेनापतींनीही पराक्रम गाजवला त्यांची आठवण करण्याचा हा दिवस आहे. तळबीडचा हा ऐतिहासिक ठेवा जतन होवून लोकांनी या गावात यावे येथील पुरातन मंदिरे वास्तुंचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.









