ऑनलाईन टीम / पुणे :
पाचगाव पर्वती येथील तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात तळजाई वन उद्यान विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्याच्या विकास कामांसाठी कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही, असे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहराच्या दृष्टिने चांगल्या गोष्टी व्हाव्यात, या मताचा मी आहे. पाचगाव पर्वती या वनक्षेत्राचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करुन त्यास नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची मंजुरी घेण्यात आलेली आहे. या आराखड्यासाठी राज्य शासनाच्यावतीने 13 कोटी रुपये उपलबध करुन दिले जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.