भावना व्यक्त करण्याकरीता माझ्यापाशी नाहीत शब्द! : पन्नास वर्षांच्या खडतर तपश्चर्येचे फळ! हा गंगावणेंचा नव्हे, कलेचा सन्मान!
- शिवछत्रपतींपासून सावंतवाडी संस्थानच्या खेम सावंतांनी दिला या कलेला राजाश्रय
- चेतन आणि एकनाथ या माझ्या मुलांनी देशपातळीवर नेली ही कला
- शिव छत्रपतींच्या सैन्यात या कलेचा वापर आमच्या पूर्वजांनी केला होता हेरगिरीसाठी
- डेक्कन ओडिसीतून येणारे आंतरराष्ट्रीय पर्यटक खास पाहण्यासाठी येतात ही कला!
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
‘माझ्या भावना मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. हे मागील पन्नास वर्षांच्या खडतर तपश्चर्येचे फळ आहे. कलेची उपासना करणाऱया एका सर्वसामान्य आदिवासी शेतकऱयाला ‘पद्मश्री’ देऊन त्याच्या कलेला सन्मान मिळवून देण्याचा मोठेपणा भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन, अशा शब्दात नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेले चित्रकथी व कळसुत्री बाहुलीकार परशुराम गंगावणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गंगावणेंच्या या भावना रास्तच आहेत. ठाकर आदिवासी कला आंगणच्या माध्यमातून चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या, चर्मवाद्ये ही काही शतकांची परंपरा असलेली कला जतन करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष फार मोठा आहे. त्याचेच फळ ‘पद्मश्री’च्या रुपात गंगावणेंना मिळालं असं म्हटलं, तर ते चुकीचं ठरू नये.
गंगावणे म्हणतात, ‘आम्हा आदिवासींच्या या कलेला शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आश्रय दिला. त्यानंतर संभाजी राजेंच्या काळात या कलेला अधिक चांगले दिवस आले. सावंतवाडी संस्थाननेही या कलेला राजाश्रय दिला. त्यामुळे ही कला जिवंत राहिली. त्यानंतर आम्ही गंगावणे कुटुंबियांनी तिचे जतन, संवर्धन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.’ इतिहासाचे संदर्भ तपासता हे सत्यच आहे. गंगावणेंचा संघर्ष अख्ख्या सिंधुदुर्गने पाहिलाय.
सर्वसामान्य आदिवासी शेतकरी कुटुंबातील हा परशुराम. अगदी बालवयातच वडील निवर्तल्यामुळे ही कला, परंपरा पुढे नेण्याची आणि त्याचबरोबर कुटुंबाचा लटपटलेला डोलारा सावरण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. छत्रपतींनी दिलेल्या राजाश्रयाच्या माध्यमातून मिळालेल्या मंदिराच्या सेवार्थ मनोरंजनाची जबाबदारी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांच्यावर आली. ही देव धर्माची चाकरी त्यांनी प्रामाणिकपणे निभावली. तीन दशकांपूर्वी म्हणजेच स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हय़ाची निर्मिती झाली, त्यावेळी जिल्हा प्रशासनाने गंगावणे यांना बोलावून घेत या कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जिल्हय़ात व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अवघ्या तिनशे रुपयात आपल्या सहकाऱयांना सोबत घेत त्यांनी ती यशस्वीपणे निभावलीही. त्यानंतर या कलेला थोडी उर्जितावस्ता आली.
लुप्त होत चाललेली ही कला संवर्धित करण्यासाठी पुढे गंगावणेंनी मोठय़ा जोमाने काम सुरू केले. हाती पैसा नसतानाही मोठय़ा जिद्दीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्याकडे चार-पाचशे वर्षांपूर्वीची नैसर्गिक रंग, नैसर्गिक कागद वापरून बनविलेली चित्रे, पारंपरिक वस्त्रs, लाकडाचा वापर करून बनवलेल्या व सजविलेल्या कळसुत्री बाहुल्या, आगळय़ा-वेगळय़ा पद्धतीची चर्मवाद्ये, चामडय़ांच्या बाहुल्या, वस्त्रालंकार, हत्यारे अशा अतिदुर्मिळ वस्तू उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांनी वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाकडे त्यांनी जागा मागतली. परंतु, शासनाकडून त्यांना जागा उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांनी आपल्या घरामागच्या गोठय़ात कला आंगण नावाने छोटेसे वास्तू संग्रहालय उभारले व अल्पावधीत त्याची कीर्ती सर्वदूर पसरली. देश-विदेशातील पर्यटक घेऊन येणारी ‘डेक्कन ओडिसी’ खास गंगावणेंचे हे कला आंगण वास्तूसंग्रहालय पाहण्यासाठी सिंधुदुर्गात यायची. या व्यतिरिक्त गंगावणेंचे दोन्ही सुपुत्र चेतन व एकनाथ हे आदिवासींची ही कला घेऊन देशभरात विविध ठिकाणी भरणाऱया मोठमोठय़ा सांस्कृतिक प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हायचे. अशा पद्धतीने लुप्त होत चाललेल्या या कलेला उर्जितावस्ता प्राप्त होत गेली. या कलेला पुन्हा एकदा राजाश्रय मिळू लागला आणि 25 जानेवारी रोजी भारत सरकारने परशुराम गंगावणेंना ‘पद्मश्री’ जाहीर करीत या कलेचा खऱया अर्थाने सन्मान केला. या सन्मानाने या कलेचे जतन आणि संवर्धन करणाऱया गंगावणे कुटुंबियांना हे कार्य अधिक बळकट करण्यास निश्चितच नवी उभारी मिळेल.
परशुराम गंगावणेंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, हा जसा त्यांचा, ठाकर आदिवासी कलेचा सन्मान आहे, तसा तो सिंधुदुर्गचाही सन्मान आहे. या अतिदुर्मिळ लोककलेमुळे सिंधुदुर्गचे व पिंगुळी-गुढीपूरचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. जशी दशावतार ही सिंधुदुर्गची ओळख आहे, अगदी तशीच ठाकर चित्रकथी कळसुत्री कला ही देखील सिंधुदुर्गची ओळख बनली आहे. या कलेला या डिजिटल जमान्यात अधिक व्यापक रुप येण्यासाठी गंगावणे यांचे दोन्ही सुपुत्र चेतन आणि एकनाथ हे अतिशय छान प्रयत्न करीत आहेत. या पद्मश्री पुरस्काराने त्यांच्या प्रयत्नांना निश्चितपणे हत्तीचे बळ मिळणार आहे.









