प्रतिनिधी / बेळगाव
घरात घुसून अनगोळ येथील एका तरुणावर तलवार हल्ला केल्याच्या आरोपावरून मंगळवारी रात्री टिळकवाडी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी तिघे जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शनिवारी मध्यरात्री रघुनाथ पेठ, अनगोळ येथे ही घटना घडली होती.
चेतन अरुण सायनाक (वय 28) राहणार रघुनाथ पेठ, अनगोळ असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनगोळ येथील पाच तरुणांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी मंगळवारी रात्री दोघा जणांना अटक केली आहे.
विनायक परशराम पाटील (वय 29), अमित अरुण बेर्डे (वय 24, दोघेही रा. अनगोळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर भादंवि 143, 147, 148, 307, 504, 506 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी तिघा जणांचा शोध घेण्यात येत आहे. मरगाई यात्रेच्यावेळी झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.









