अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्गार : व्हाइट हाउसच्या डॉक्टरांनी फेटाळला दावा
अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संकटाने भयावह रुप धारण केले आहे. पुढील 2 आठवडय़ांमध्ये बळींचा आकडा टोकाला पोहोचू शकतो, असे उद्गार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउस येथील पत्रकार परिषदेत काढले आहेत. अमेरिकेतील सोशल डिस्टंसिंगची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्थिती बिघडल्यास अमेरिकेत 22 लाख जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
12 एप्रिल रोजी ईस्टर असून ख्रिश्चनांचा हा मोठा सण आहे. अमेरिकेत तोपर्यंत बळींचा आकडा टोकाला पोहोचू शकतो. कोरोनावर विजय मिळवेपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागणार आहे. लवकरच हे संकट निवळणार असल्याची अपेक्षा असल्याचे ट्रम्प म्हणाले.
2 लाखांपेक्षा अधिक बळी शक्य
देशात आताच बंधने लागू न केल्यास 2 लाखांपेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागू शकतो, असा सल्ला अध्यक्ष ट्रम्प यांना तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. अमेरिकेतील वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी एस. फॉसही यांनी हा अनुमान सायंटिफिक मॉडेलिंगच्या आधारावर व्यक्त केला आहे. त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये याचे एक सादरीकरणही केले आहे. अमेरिकेत अनेक बंधने लागू करणे तसेच आवश्यक पावले उचलल्यावरही 80 हजार ते 1.60 लाख लोकांना जीव गमवावा लागू शकतो. हा आकडा 2 लाखापर्यंत पोहोचू शकतो असे क्हाइट हाउसमधील कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे समन्वयक डॉ. डेबोरा बर्क्स यांनी म्हटले आहे.
स्थिती बिघडण्याची भीती
सोशल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन न केल्यास अमेरिकेतील बळींचा आकडा वाढू शकतो. बळींचा आकडा 1 लाखापर्यंत राखला तरीही तो विजय ठरणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. स्थिती योग्यप्रकारे हाताळली न गेल्यास ती हाताबाहेर जाऊ शकते. परंतु आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असे उद्गार डॉ. फॉसी यांनी काढले आहेत. योग्य पावले उचलत आहोत असे आम्ही मानत असलो तरीही कुठलेही प्रारुप पूर्णपणे योग्य ठरू शकत नाही असे डॉ. बर्क्स यांनी म्हटले आहे.
अलास्कात वैद्यकीय सुविधेची गरज
अलास्का येथे 85 रुग्ण सापडले असून तेथे एकाचा मृत्यू देखील झाला आहे. प्रांतातील 7.37 लाख लोकसंख्येचा 40 ते 70 टक्के हिस्सा कोरोनाच्या तावडीत सापडू शकतो. प्राथमिक अहवालाच्या आधारावर 20 टक्के लोकसंख्या म्हणजेच 59 हजार लोकांसाठी वैद्यकीय सुविधेची गरज भासणार आहे.
कॅनडाचे पंतप्रधान विलगीकरणात
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे पत्नी सोफी कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त होऊन देखील विलगीकरणाची प्रक्रिया राबविणार आहेत. सोफी 28 मार्च रोजी कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त झाल्या होत्या. कॅनडात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णांची संख्या 6 हजार 320 झाली आहे.
दिशानिर्देशांचे जनतेने पालन करणे गरजेचे
प्रत्येक व्यक्तीने दिशानिर्देशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. संसर्ग फैलाव रोखणे आवश्यक असल्याने सोशल डिस्टंसिंगची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविली जाणार आहे. या निर्णयाद्वारे कोरोनाची तीव्रता कमी करता येणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या ग्रामीण भागाला अधिक धोका
अमेरिकेच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोना महामारी शहरांच्या तुलनेत अधिक नुकसान घडवू शकते. ग्रामीण भागात पुरेशा संख्येत डॉक्टर तसेच रुग्णालये नाहीत. अरकंसास, मिसिसिपी, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना यासारख्या मध्यपश्चिम तसेच दक्षिण भागातील ग्रामीण क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. काही क्षेत्रांमध्ये वैद्यकीय क्षमता मर्यादित आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेत भर पडत असल्याचे कोडिकचे पदाधिकारी प्लेटनिकॉफ यांनी म्हटले आहे.









