येडियुराप्पा यांचा असंतुष्ट आमदारांना इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्रातील नेत्यांची अपेक्षा आणि सूचनेनुसार आपण राज्य मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. केंद्रातील नेत्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणाला काहीही करता येणार नाही. आपण कोणालाही घाबरणार नाही, असा टोमणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सीडीविषयी धमकावणाऱया राज्य भाजपमधील नेत्यांना हाणला आहे. कोणीही खालच्या पातळीवरील विधाने करू नयेत. तक्रारी असतील तर हायकमांडकडे मांडा, असा इशाराही त्यांनी असंतुष्ट आमदारांना दिला आहे.
मकर संक्रांतीनिमित्त गुरुवारी बेंगळूरमधील शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ या ठिकाणी गोमातेचे पूजन केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर काही आमदार संतापाच्या भरात वाटेल तशी विधाने करीत आहे. पक्षाच्या वर्चस्वाला धक्का बसण्याचा धोका असून याबाबत प्रत्येकाने जागरूक असणे गरजचे आहे. असंतोष असेल तर दिल्लीला जाऊन वरिष्ठांकडे तक्रार करता येईल. त्याला आपला कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. वरिष्ठांना काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे चांगलेच ठाऊक आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार होताच राज्य भाजपमध्ये असंतोष वाढला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने अनेक आमदार हायकमांडकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी असंतुष्ट आमदारांनी व्युहरचना आखली आहे. त्यामुळे येडियुराप्पा यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव आमदार एम. पी. रेणुकाचार्य दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी गुरुवारीच दिल्लीला प्रयाण केले आहे.









