आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची चिंता; कास पाणीपुरवठय़ासाठी वाढीव क्षमतेची पाईपलाईन करण्याच्या सूचना सातारा पालिकेकडून कार्यवाही शून्य
प्रतिनिधी / सातारा
पुढील 50 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून कास धरण उंची वाढवण्याचे काम मंजूर झाले. त्यासाठी वाढीव 58 कोटी निधीही उपलब्ध करून दिला आहे. येत्या 15 मे पर्यंत हे काम पूर्णत्वास जाणार आहे. असे असले तरी वाढीव पाणी क्षमता गृहीत धरून त्या क्षमतेची जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. याबाबतीत सातारा पालिका प्रशासनाकडून सर्व्हे, इस्टिमेट आदी काहीच कार्यवाही झालेली नाही. कास धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सातारकरांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा व्हायचा असेल तर नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. अन्यथा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सातारकारांवर ओढवेल अशी चिंता व्यक्त करतानाच नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी सर्व्हे, इस्टिमेट आणि प्रस्ताव तयार करा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाला केल्या.
गेल्या काही वर्षांपासून कास धरण उंची वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सातारकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱया आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी सुरुवातीला 43 कोटी तर, नुकताच 58 कोटी वाढीव निधी मिळवून दिला. यांनतर या प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा युद्धपातळीवर सुरु झाले. दरम्यान, या प्रकल्पाचे काम येत्या 15 मे ला पूर्णत्वास जाणार आहे. कास धरणाच्या उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले तरी सातारकरांना मात्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कास धरणाची उंची वाढल्यानंतर पाणी पातळीत पाच पट वाढ होणार आहे. कास धरणापासून सातारा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 1998 ते 2000 या कालावधीत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. उंची वाढल्यानंतर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा वाढीव क्षमतेने होणार नाही. वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव क्षमतेची नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. याकडे पालिका प्रशासनाने अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. वाढीव क्षमतेची जलवाहिनी टाकणे आवश्यक असून त्यासाठी सर्व्हे करून इस्टिमेट तयार करणे आणि तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. कास धरणातून सायफन पद्धतीने सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. यासाठी विजेची अथवा कोणत्याही मशिनरीची गरज भासत नाही. या योजनेमुळे पालिकेवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडत नाही.
असे असूनही या बाबीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येताच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना तातडीने सर्व्हे करून इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करून वाढीव जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. स्वखर्चाने नवीन जलवाहिनी टाकणे पालिकेचे बजेट पाहता पालिका प्रशासनाला शक्य होणार नाही. या कामासाठी निधी कसा मिळवायचा आणि सातारकरांचा हा प्रश्न कसा सोडवायचा ते मी बघतो, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. वाढीव क्षमतेची जलवाहिनी नसल्याने धरणाचे काम पूर्ण होऊनही सातारकरांना पाणी मिळणार नाही. ही बाब गंभीर आहे. मग धरणाची उंची वाढवून काय फायदा? त्यामुळे पालिका प्रशासनाने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी तातडीने सर्व्हे आणि इस्टिमेट करून प्रस्ताव पाठवा अशा सक्त सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकायाना केल्या आहेत.