माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचा विचार
नवी दिल्ली
कोरोना महामारीची सध्याची स्थिती पाहता लाळबंदी हा सुरक्षित पर्याय असला तरी क्रिकेट प्रशासकांनी लवचिकता दाखवून खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली तर त्याचा वापर करण्याची परवानगी देण्याचा विचार करावा, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने मांडले आहे.
तो स्वतः जलद गोलंदाज असल्याने लाळेच्या वापराचे महत्त्व त्याला पूर्ण ज्ञात आहे. फलंदाजांसाठी जशी बॅट, तसा वेगवान गोलंदाजांसाठी लाळेचा वापर फार महत्त्वाचा असतो, असे त्याला वाटते. 8 जुलैपासून इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिका सुरू होत असून कोव्हिडच्या ब्रेकनंतरची ही पहिली क्रिकेट मालिका असेल. ‘माझा मुद्दा असा आहे की, सामना सुरू होण्याआधी सर्व खेळाडूंची चाचणी घेतली जाणार आहे. जर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर चेंडूवर लाळेचा वापर करणे त्यांच्यासाठी सुरक्षित असेल, असे मला वाटते. हे माझे वैयक्तिक मत असून यासंदर्भात वैद्यकीय तज्ञ योग्य प्रकारे माहिती देऊ शकतील,’ असे आगरकरने स्पष्ट केले. आयसीसीकडे सध्याच्या परिस्थितीत लाळबंदीशिवाय दुसरा पर्याय नाही, याचीही त्याला जाणीव आहे.
‘चेंडूला लकाकी आणणे महत्त्वाचे आहे, यात कोणतेच दुमत नाही. पण आयसीसीपुढे त्यावर बंदी घालण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्याचा वापर करून देण्यास होकार देणे अशक्यच आहे. त्यामुळे त्यांनी सर्वात सुरक्षित उपायाचा अवलंब केला आहे, हे समजण्यासारखे आहे. वेगवान गोलंदाजांना लाळेच्या वापराविना गोलंदाजी करणे नक्कीच सोपे जाणार नाही. त्यामुळे इंग्लंड-विंडीज मालिकेत काय होते, त्याची प्रतीक्षा करावी लागेल,’ असे तो म्हणाला. क्रिकेट हा खेळ सध्या फलंदाजांसाठी अनुकूल ठरणारा असल्याने लाळबंदीमुळे वेगवान गोलंदाज निराधार झाल्यासारखे होतील, असे त्याला वाटते. सध्या काही ठिकाणी खेळपट्टय़ा गोलंदाजांनाही मदत करणाऱया असतात. अशा ठिकाणी समतोल राखला जातो. पण सर्वसाधारणपणे फलंदाजांचेच विश्व क्रिकेटवर वर्चस्व असल्याचे दिसून येते,’ असेही 349 आंतरराष्ट्रीय बळी मिळविलेला आगरकर म्हणाला.









