ऑनलाईन टीम/तरुण भारत
तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव विधानसभेत भलतेच संतापलेले पाहायला मिळाले. हैदराबाद आणि सिकंदराबाद येथील कॅन्टोन्मेंट हद्दीतील संरक्षण क्षेत्रातील वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. लोकल मिलिटरी अथॉरिटी जर रस्ते बंद करून नागरिकांची गैरसोय करत राहील आणि चेकडॅम बांधून पाण्याच्या मुक्त प्रवाहात आणि विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असतील, तर त्यांचा वीज आणि पाण्याचा पुरवठा खंडित करू, असं तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव विधानसभेत म्हणाले.
दरम्यान, शनिवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी कौसर मोहिउद्दीन आणि इतर सदस्यांनी स्ट्रॅटेजिक नाला डेव्हलपमेंट प्रोग्रामवर उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केटी रामाराव यांनी लोकल मिलिटरी अथॉरिटीला खडे बोल सुनावले आहेत. तसेच या सर्व समस्यांबाबत लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करा, असे आदेश त्यांनी विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांना दिले. जर त्यांनी राज्य सरकारच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही, तर छावणीच्या हद्दीतील संरक्षण भागात वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करा, असं ते म्हणाले.