माजी आरोग्य सभापतींचा इशारा
प्रतिनिधी / मालवण:
मालवण शहरातील वायरी भागात कचऱयाची तीव्र समस्या निर्माण झाली असून कचरा उठाव पूर्णपणे बंद झालेला आहे. पालिकेने यावर उपाययोजना केलेली नसून त्याच्या निषेधार्थ पालिकेच्या आवारात आणि दरवाजात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा माजी आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी दिला आहे.
लुडबे यांनी निवेदनात म्हटले आहे, मालवण शहरात कचरा उचलण्याची सुयोग्य यंत्रणा मागील तीन वर्षांपासून सुरू होती. ती हळूहळू जाणीवपूर्वक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मालवण शहरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिग दिसत आहेत. शहरातील प्रत्येक घरातून कचरा घेण्यासाठी आजही कर्मचारी घेतलेले आहेत. परंतु, त्यांना दिलेले वाहन बंद आहे. नागरिकांना कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास दंड भरण्याची भीती दाखविली जाते. परंतु त्यांच्या घराजवळून कचरा उचलला जात नाही. अशावेळी नागरिकांना काय करावे हे कळत नाही. कचऱयाची ही समस्या वेळोवेळी सभागृह तसेच प्रशासनास लोकप्रतिनिधींनी तसेच पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले आहे. परंतु त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्याचा रोष नागरिक आम्हा लोकप्रतिनिधींवर काढत आहेत. शहराप्रमाणेच माझ्या वायरी प्रभागातही कचऱयाची समस्या निर्माण झाली आहे. ती लवकरात लवकर सोडवावी. जर पुढील पंधरा दिवसात घरस्तरावर कचरा उचलण्याची व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू न झाल्यास माझ्या प्रभागातील नागरिकांना घेऊन घरातील कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल, असाही इशारा लुडबे यांनी दिला आहे.









