ऊस उत्पादक शेतकऱयांची मागणी
अरुण टुमरी /काकती
येथील मार्कंडेय साखर कारखान्याचे प्रतिटन 2200 रुपये ऊस उत्पादकांना दिले आहेत. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. ऊस पिकविणाऱया शेतकऱयांना वाढता उत्पादन खर्चाचा अधिभार झाला आहे. मात्र, संचालक मंडळाने शेवटचा हप्ता वाढवून देण्याबाबत हालचाली नाहीत. एफआरपी प्रमाणे दर मिळाला नाही तर शेवटचा हप्ता वाढीव द्यावा, अशी मागणी होत आहे.
यंदा बेळगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असून सहा हजार हेक्टरात ऊसपीक आहे. आपल्या हक्काच्या मार्कंडेय साखर कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांनी लागवड केली आहे. सन 2020-21 या सालात कारखान्याकडून प्रतिटन 2200 रुपये मिळाले आहेत. कारखान्याच्या जागेवर उसाच्या वजनमापात काटामारी नसून, तोलाईत स्वच्छ पारदर्शकता आहे. याबाबत उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.
एफआरपीपेक्षा कमी भावात तफावत
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार 2020-21 सालाकरिता 10 टक्के साखर रिकव्हरीला साखरेला रु. 2850 प्रतिटन तर साखर उताऱयावरच जादा भाव अशी तरतूद आहे. तथापि साखर उतारा 9.5 टक्के किंवा कमी असेल तरी 2707.50 असा प्रतिटन भाव देणे आवश्यक आहे. बेळगाव परिसरातील साखर उताराही सरासरी चांगला असून आजपर्यंत कारखान्याने रु. 2200 प्रतिटन शेतकऱयांना दिले आहेत. शेतकऱयांची थकबाकी नाही, ही कारखान्याच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. मात्र शेतकऱयांना भाव देण्यात तफावत आहे.
शिल्लक साखरेला वाढीव भावाचा फायदा
मार्कंडेय साखर कारखान्याची साखर उत्तम ए ग्रेडची असून या साखरेला बाजारात सुरुवातीला रुपये 3000 प्रति क्विंटलपासून रुपये 3100 पर्यंत भाव मिळाला आहे. आज उत्पादनातील जवळपास कारखान्याकडे 55 ते 60 टक्के साखर शिल्लक आहे. सध्या बाजारात या साखरेला 3285 हा वाढीव भाव मिळत असून जीएसटी अतिरिक्त आहे. स्थानिक बाजारात भाव वाढत आहेत. विक्रीसाठी कारखान्याच्या गोदामात साखर शिल्लक आहे. वाढलेल्या भावाचा फायदा निश्चित कारखान्याला होणार आहे. तेव्हा शेतकऱयांना याचा लाभ व्हावा अशी अपेक्षा आहे.
वर्षभर भाव तेजीत, निर्यातीला संधी
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढत आहेत. ब्राझीलमध्ये यंदा ऊस पिकांवर दुष्काळाचा वाईट परिणाम झाला असून मागील हंगामापेक्षा 50 लाख मे. टन साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तर थायलंडमध्ये 2021-22 च्या हंगामात मागील वर्षापेक्षा 15 लाख मे. टन साखर जादा होण्याची शक्यता आहे. असे असले तरी वर्षभरात जागतिक बाजारपेठेत 40 लाख टन साखरेची कमतरता भासणार आहे. परिणामी जागतिक बाजारात भारतीय कारखानदारांना साखर निर्यातीची संधी लाभणार आहे. याचा फायदा मार्कंडेयला देखील मिळणार असून साखर निर्यात एजन्सीशी करार देखील किफायतशीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सेंट्रल कॅबिनेट कमिटी इकॉनॉमिक्स अफेअर्स यंदा एफआरपी दरात देखील 8 ते 12 रुपयांनी वाढ होणार आहे. असे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. साखरेचे भाव वाढले तरच शेती तारणार आहे. तसेच कारखानदारी टिकणार आहे. साखरेचे भाव वाढत असल्याने शेतकऱयांना उसाचे भाव वाढवून देणेही तितकीच कारखान्याची जबाबदारी आहे.









