ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीनमध्ये लडाखमधील सीमावादावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने चर्चा सुरू आहेत. गलवान खोऱ्यातील चिनी सैन्य मागे घेण्याबाबत दोन्ही देशात सकारात्मक चर्चाही झाल्या. तरी देखील काही भागातून चीनने सैन्य मागे घेतले नाही. चीनसोबतची यापुढील चर्चा फिस्कटली तर भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय सैन्य आक्रमक होण्याची शक्यता आहे, असे संरक्षण दलांचे प्रमुख CDS बिपीन रावत यांनी म्हटले आहे.
रावत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. रावत म्हणाले, भारत-चीनमध्ये सीमावादावरून निर्माण झालेला तणाव निवळण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चीनने अडमुठेपणाची भूमिका घेतली आहे. सीमारेषेवरील सैन्य मागे घेण्यासाठी दोन्ही देशात सकारात्मक चर्चा झाल्या. काही भागातील सैन्य दोन्ही देशांनी मागे घेतले. मात्र, पँगाँग तलावाच्या परिसरात असणाऱ्या फिंगर 5 परिसरात चीनने मोठ्याप्रमाणावर सैन्य आणि युद्धसामुग्री तैनात केली आहे.
वरिष्ठ लष्करी आणि राजनैतिक पातळीवर होणाऱ्या चर्चेतून मार्ग निघाला नाही तर भारत सैन्य कारवाईचा विचार करेल, असेही रावत म्हणाले.









