90 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण : भारतीयांना परत आणल्यास नवे संकट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू जगभरातील 90 देशांमध्ये फोफावला आहे. चीनच्या मागोमाग इटली आणि इराणमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 90 देशांमध्ये कोरोना संकट निर्माण झाले असून या प्रत्येक देशातून भारताच्या नागरिकांना परत आणू लागलो तर देशवासीयांमधील भीती वाढणार असल्याचे प्रतिपादन विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी केले आहे.
इटली आणि इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या प्रयत्नांवर केंद्र सरकारने पूर्ण लक्ष दिले आहे. पण या भारतीय नागरिकांची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे जयशंकर यांनी राज्यसभेत बोलताना म्हटले आहे.
वैद्यकीय पथक गुरुवारी इटलीसाठी रवाना होणार असून तेथील भारतीयांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. इटली आणि इराणमधील सद्यस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकार भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे. कोरोनाची स्थिती गंभीर असलेल्या देशांवर सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.
जगभरातून भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू केल्यास जनतेतील भीती वाढणार आहे. भारताने चीनच्या वुहानमध्ये पोहोचून नागरिकांना परत आणल्याचे प्रतिपादन जयशंकर यांनी केले आहे. इराणच्या विविध प्रांतांमध्ये 6 हजार भारतीय नागरिक अडकून पडले असून यात 1100 भाविक आहेत.
भाविकांमध्ये बहुतांश जण लडाख आणि जम्मू-काश्मीर तसेच महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. इराणमध्ये सुमारे 300 विद्यार्थीही अडकून पडले असून यातील बहुतांश जण जम्मू-काश्मीरचे आहेत. तर 1 हजार मच्छिमारही तेथे असून ते प्रामुख्याने केरळ तामिळनाडू आणि गुजरातचे रहिवासी आहेत.









