ऑनलाईन टीम / पाटणा :
भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यामध्ये 11 मोठे संकल्प केले. ‘भाजप है तो भरोसा है, 5 सूत्र एक लक्ष, 11 संकल्प’ यासह नवीन नारा दिला.

निर्मला सीतारामन म्हणल्या, कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत मास्क वापरणे गरजेचे आहे. ही लस उपलब्ध झाल्यावर तिचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन केले जाईल. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बिहारच्या जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ झाली, असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपची पाठ थोपटली. ‘एनडीए’च्या 15 वर्षांच्या कार्यकाळात बिहारचा जीडीपी 3 टक्क्यांवरून 11.3 टक्क्यांवर गेला. बिहारमध्ये जंगलराज असते तर हे शक्य झाले नसते. एनडीए सरकारने सुशासनाला प्राधान्य दिल्यामुळेच बिहारचा हा विकास शक्य झाला, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
भाजपचे जाहीरनाम्यातील 11 संकल्प
- बिहारमधील प्रत्येक रहिवाश्यांना कोरोनाची लस मोफत देणार.
- वैद्यकीय अभियांत्रिकी आणि इतर शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करून देण्यात येईल.
- पुढील पिढीसाठी आय टी हब आणि पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती
- एका वर्षात संपूर्ण राज्यात तीन लाख शिक्षक भरती केली जाणार आहे.
- एक कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार
- आरोग्य विभागात एक लाख नोकऱ्या तसेच 2024 पर्यंत दरभंगा एम्स सुरू करणार
- धान, गहू नंतर डाळीची खरेदीही एम एस पी दराने केली जाणार
- 30 लाख लोकांना पक्की घरे देणार
- 2 वर्षात 15 नवीन प्रक्रिया उद्योग स्थापन करणार
- शेतकरी उत्पादक संघटनेची पुरवठा तयार करणार, ज्यातून रोजगारास प्राधान्य
- गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन वाढवण्यावर जोर दिला जाईल









