गुलाम नबी आझाद यांनी मांडली व्यथा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद स्वतःच्या भूमिकेवर कायम आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समवेत संघटनेच्या प्रमुख पदांसाठी निवडणूक व्हावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीला विरोध करणारे स्वतःचे पद जाण्याच्या भीतीने घाबरत आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्यक्षाकडे एक टक्का देखील पाठिंबा नसण्याची शक्यता आहे. पक्षाची निवडून आलेली कार्यकारिणी नेतृत्व करणार नसल्यास स्थिती सुधारणार नाही, अन्यथा काँग्रेस पुढील 50 वर्षांपर्यंत विरोधकांमध्ये राहणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.
मागील अनेक दशकांपासून पक्षात निवडून आलेल्या समित्या कार्यरत नाहीत. बहुधा आम्ही 10-15 वर्षांपूर्वीच पक्षांतर्गत निवडणूक घ्यायला हवी होती. आम्ही एका मागोमाग एका निवडणुकीत पराभूत होत आहोत. पुनरागमन करायचे असल्यास निवडणूक घेत पक्षाला मजबूत करावे लागणार आहे. माझ्या पक्षाला (काँग्रेस) पुढील 50 वर्षांपर्यंत विरोधकांमध्ये बसायचे असल्यास पक्षांतर्गत निवडणुकीची कुठलीच गरज नसल्याचे खोचक विधान आझाद यांनी केले आहे.
अध्यक्षपद नको
माझी कुठलीच वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. मी एकदा मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री राहिलो आहे. काँग्रेस कार्यकारिणीचा सदस्य तसेच सरचिटणीसपद भूषविले आहे. स्वतःसाठी मी काहीच मागत नाही. पुढील 5 ते 7 वर्षे सक्रीय राजकारणात राहणार आहे. पक्षाचा अध्यक्ष होण्याची माझी इच्छा नाही. एका खऱया काँग्रेसीप्रमाणे पक्षाच्या भल्यासाठी निवडणूक इच्छितो असे आझाद म्हणाले.
निवडून आलेला अध्यक्ष
निवडणूक लढविली जाते, तेव्हा किमान 51 टक्के मते विजयी उमेदवारासोबत असतात. उर्वरित उमेदवारांना 10 किंवा 15 टक्के मते मिळतील. विजयी होणारा पक्षाचे अध्यक्षपद सांभाळेल. सद्यकाळात काँग्रेस अध्यक्ष होणाऱया व्यक्तीकडे 1 टक्के लोकांचेही समर्थन नसणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य निवडून आल्यास त्यांना हटविता येत नाही. निवडणुकीमुळे पक्षाचा पाया घट्ट होतो. दुसऱया आणि तिसऱया क्रमांकावर राहणारे पक्षाला अधिक मजबूत करत पुढील निवडणूक जिंकायची असल्याचे विचार करू लागतील. परंतु नियुक्त होणाऱया अध्यक्षाला 1 टक्के कार्यकर्त्यांचेही समर्थन नसते असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पक्षांतर्गत निवडणूक नसल्याने नुकसान
अंर्गत निवडणूक न होण्याचा फटका पक्षाला राष्ट्रीय आणि राज्याच्या निवडणुकांमध्ये बसत आहे. काँग्रेस पक्ष काही नेत्यांच्या शिफारसीवर कुणालाही राज्यात पक्षाध्यक्ष करत असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी रहावे असा प्रस्ताव संमत केल्याच्या पार्श्वभूमीवर आझाद यांची भूमिका समोर आली आहे.
..तर अनेक नेते गायब
जे प्रामाणिक असल्याचा दावा करत आहेत, प्रत्यक्षात ते गलिच्छ राजकारणकरत आहेत. पक्ष आणि देशाच्या हितांसाठी असे नेते धोकादायक आहेत. आमच्या प्रस्तावाला विरोध करणारे नेते निवडणूक झाल्यास आपण कुठेच नसणार हे चांगलेच जाणून आहेत. काँग्रेसशी मनाने जोडला गेलेला कार्यकर्ता आमच्या पत्राचे स्वागतच करणार आहे. राज्य, जिल्हा आणि विभाग स्तरावर अध्यक्षांची निवड पक्षकार्यकर्त्यांनी करावी असे आझाद यांनी सुचविले आहे.









