ऑनलाईन टीम / जिनेव्हा :
जगावर ओढवलेले कोरोना संकट अद्याप नियंत्रणात आले नाही. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन होत नसल्याने येत्या काळात ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे, तसे न झाल्यास परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी दिला आहे.
जिनेव्हामध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. टेड्रॉस म्हणाले, जगभरात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाच्या केसेस समोर येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. लोकांनीही आपली काळजी घेतली पाहिजे. सोशल डिस्टन्स फार महत्वाचा आहे.
जगातले अनेक देश कोरोनाचा सामना करताना चुकीच्या दिशेने जात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन होत नसल्याने युरोप आणि आशियामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याचा इशारा टेड्रॉस यांनी दिला आहे. तसेच सध्या अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आरोग्य तज्ज्ञ यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.









