ऑनलाईन टीम / मुंबई :
हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाली आहेत. शाहीस्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी हरिद्वारमध्ये उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता कुंभमेळ्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करून समाप्त करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर आता काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी भाजपवर टीका आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी कुंभ प्रतिकात्मकच ठेवले जावे ही विनंती केली ही चांगली गोष्ट आहे. मोदींच्या जागी आणखी कोणीतरी असते तर त्याला हिंदू द्रोही ठरवले असते. हरिद्वारमध्ये कालपर्यंत 49 लाख लोकांनी स्नान केले आहे. कोलकातापर्यंत जाणारी ही गंगा आणखी किती कोरोना घेऊन जाणार हे माहित नाही, अशी टीका संजय निरूपम यांनी केली आहे. तर कुंभमेळा तात्काळ थांबवला पाहिजे, अशी विनंती त्यांनी स्वामी अवधेशानंद यांना केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त करतो असेही सांगितले. पुढे ते म्हणाले, मी विनंती करतो की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.








