नांदेड/प्रतिनिधी
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मराठा मूक आंदोलनाला संबोधित करताना मोठा गौप्यस्फोट केला. मराठा आरक्षणासाठीच्या मूक आंदोलनाला नांदेडमधून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. मूक आंदोलनावेळी बोलताना संभाजीराजे यांनी संसदेत घटना दुरुस्ती वेळीच एक किस्सा सांगितलं. त्यांनी संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारण्यात आली. पण महाराष्ट्रातील आपल्या खासदारांमुळे मला बोलायला संधी मिळाली. मात्र, ही संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडली असती , असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांनी केला.
मला समाजाची भावना मांडायची आहे. त्यामुळे मला संसदेत बोलण्याची परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती. पण मला बोलायला परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे, आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे. पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली. त्या खासदारांचेही मी आभार मानतो, असंही यावेळी संभाजीराजे म्हणाले.








