- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले. एनसीबीने तपास सुरु केल्यानंतर या क्षेत्रातील अनेक मोठी नावे समोर आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने बॉलिवूडमधील आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनच्या तपासाची मागणी केली आहे. या संदर्भात एनसीबीला तक्रार केली आहे. मात्र, एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात महाराष्ट्र पोलीस तपास सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

भाजप नेत्यांच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन तक्रार केली. यापूर्वी सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र, एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील, असे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
सचिन सावंत यांनी भाजपचे स्टार प्रचारक विवेक ओबेरॉय याचे ड्रग्ज कनेक्शनचा तपास करावा अशी मागणीही यावेळी केली. ते म्हणाले, बेंगळूर पोलीस येऊन विवेक ओबेरॉय ची तपासणी करतात मग एनसीबी का करत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.








