नागपूर/प्रतिनिधी
कितीही मोठा नेता असेल, पण पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून उतरवून लाथा घाला, असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणूक आणि जिल्हा परिषद समित्यांच्या निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गद्दारांना धडा शिकवा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. सुनील केदार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्री सुनील केदार यांनी -“निवडणुकीत काँग्रेसचा कितीही मोठा नेता बेईमानी करत असेल तर त्याला तिथंच गाडीतून उतरवा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसचं मी पाहून घेईन,” असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. आपण सर्वांनी मेहनतीने हा पक्ष उभा केला असल्याचंही यावेळी ते म्हणत आहेत. कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्या मागे आहे त्यामुळे वाटेल तसं करणार हे चालणार नाही असंही यावेळी ते म्हणाले. तसंच मला फोन करा असंही त्यांनी म्हटलं आहे.








