ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना अभिनंदनाचे पत्र लिहण्याची सूचना करणारी अहमदाबादमधील लिटिल स्टार शाळा वादाच्या भोवऱयात सापडली आहे.
अहमदाबादमधील लिटिल स्टार शाळेने पाचवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱया विद्यार्थ्यांना नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याबद्दलचे अभिनंदन करणारे पत्र लिहिण्यास सांगितले होते. त्या पत्राचा मायनादेखील शाळेने फळ्यावर लिहून दिला होता. तसेच ही पत्रे विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, सचिवालय इमारत, रायसिना हिल्स, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्यास शाळेने सांगितले होते. पत्र न पाठविणाऱया विद्यार्थ्यांना शाळेतील इंटरनलचे मार्क्स मिळणार नसल्याचे शाळेने सांगितले होते. त्यावर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर शाळेने याप्रकराबाबत माफी मागितली आहे.
शिक्षकांनी शाळेत फळ्यावर लिहिलेल्या पत्राच्या मायन्यात म्हटले आहे की, अभिनंदन ! मी भारताचा नागरिक म्हणून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. माझा आणि माझ्या कुटुंबाचा या कायद्याला पाठिंबा आहे,’ असा मायना फळ्यावर लिहिण्यात आला होता.