माजी मुख्यमंत्री राजेंद्र कौर भट्टल यांचे विधान : ‘आप’कडून मात्र नकार
पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. पंजाबमध्ये त्रिशंकू विधानसभा होणार असल्याच्या चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या राजेंद्र कौर भट्टल यांनी 10 मार्च रोजी कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होऊ शकते असे म्हटले आहे.
पंजाबच्या हितासाठी राजकीय पक्ष निर्णय घेऊ शकतात. पंजाबचे लोक भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला सत्तेपासून दूर ठेवू इच्छित आहेत. ज्या पक्षाच्या अधिक जागा जिंकून येतील, त्याचाच मुख्यमंत्री होणार आहे. आता तर मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्रीही नेमला जात असल्याचे राजेंद्र कौर यांनी म्हटले आहे.
आम्हाला अद्याप काँग्रेसच सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या. तर सुनाम मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार अमन अरोडा यांनी राजेंद्र कौर यांचा दावा खोडून काढला आहे. आमच्या पक्षाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. काही राजकीय पक्षांकडून होणारी लूट पाहूनच पंजाबच्या जनतेने आम आदमी पक्षाला मत दिले आहे. लोकांनी एकतर्फी निर्णय घेतला असून आमचे सरकार सत्तेवर येणार आहे. आम आदमी पक्षाला आघाडी करण्याची गरज भासणार नसल्याचे अरोडा यांनी म्हटले आहे.
दिल्लीत 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्याने आम आदमी पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. हे सरकार 49 दिवस चालले होते. त्यानंतर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने पुन्हा झालेल्या निवडणुकीत आपने पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन केले होते.









