देवरूखातील मध्यरात्रीची घटना, पोलिसांनी पाठलाग करून घेतले दोघांना ताब्यात
वार्ताहर/ देवरुख
तरूणावर हल्ला करून त्याच्या गळय़ातील सोनसाखळी खेचणाऱया आणि मोबाईल लांबविणाऱया चोरटय़ांना चक्क 15 किलोमीटर पाठलाग करून पकडण्यात आले. देवरुख पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली. ही थरारक घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. देवरुख पोलिसांच्या या कामगिरीबद्दल तालुकावासियांकडून कौतुक होत आहे.
धर्मा राम उर्फ कोजाराम वीष्णोई (19) आणि हिराराम बाबुराम वीष्णोई (25) राहणार राजस्थान असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.देवरुख येथील एचपी गॅस एजन्सीचे पुष्कर राजेंद्र पाटोळे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.पुष्कर पाटोळे (31, देवरुख मराठा कॉलनी)हे नेहमी प्रमाणे आपल्या गॅस कंपनीचे काम आटपून घरी निघाले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या दोघा अनोळखी इसमानी पुष्करवर हल्ला केला.त्यांना मारहाण करून गळ्यातील चेंन ओढली आणि त्याच वेळी पडलेला मोबाईल देखील त्यांनी लांबविला.ही घटना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.
आपल्यालावर अनोळखी तरुणांनी मारहाण करून आपल्या गळय़ातील सोनसाखळी आणि मोबाईल चोरल्याची खबर त्यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तात्काळ दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून देवरुख पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी नाकाबंदीचे आदेश दिले. याच दरम्यान देवरूख ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग हे गस्तीवर चालक रिलेश कांबळे सोबत निघाले होते.मात्र याच वेळी नाकेबंदी करताना मिळत्या जुळत्या वर्णनाचे दोन तरुण बाईकवरून वेगात जाताना दिसले आणि पोलिस उपनिरीक्षक श्री.बाईंग यांनी त्यांच्यावर नजर ठेवून कांबळे यांना पाठलाग करायला सांगितले.सुमारे 15 किलोमीटर थरारक पाठलाग केल्यानंतर कोंडगाव तिठा इथे त्यांना पकडले. रात्री उशिरा ही कामगिरी करण्यात आली.
पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ही कामगिरी फत्ते केली.यात चोरटय़ांनी वापरलेली टीव्हीएस मोटारसायकल, मोबाईल ताब्यात घेतले आहेत.चोरटय़ांना रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.त्यांना रविवारी सायंकाळी देवरूख न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.









