-संगमेश्वर-कोंडगावातील हल्ल्यात तरूण गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
प्रतिनिधी/ देवरुख
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कब•ाr स्पर्धेवेळीच्या वादाचा राग मनात धरून संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील तरूणावर तलवारीने वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे बुधवारी साखरपा परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी साखरपा पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी साखरपा बाजारपेठ बंद ठेवली होती. या घटनेची नोंद साखरपा पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली आहे.
भडकंबा येथील सागर महेश वैद्य (24) या तरूणावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात सागर वैद्य हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने सागरला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोंडगाव येथे दोन दिवसांपूर्वी कब•ाr स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाचाबाची झाली. दरम्यान हा वाद मिटवण्यात आला. याचाच राग हल्लेखोरांनी मनात धरून सागर याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
साखरपा बसस्थानक येथे पोलिसांना घेराव
या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी साखरपा पंचक्रोशीत उमटले. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण कोंडगाव बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदवला. हजारोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली होती. जमावाने आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करून साखरपा बसस्थानक येथे पोलिसांना घेराव घातला. 16 तास उलटून गेले तरी आरोपींना अटक का करण्यात आली नाही, असा संतप्त सवाल जनतेने केला.
तोपर्यंत साखरपा पंचक्रोशीतील जनता गप्प राहणार नाही
कोंडगावमध्ये सध्या भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गुंडगिरी पोलिसांनी मोडीत काढावी तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत साखरपा पंचक्रोशीतील जनता गप्प राहणार नाही, असा इशारा जमावाने दिला. आक्रमक जनतेने निषेध मोर्चाची तयारी केली होती. मात्र पोलीस यंत्रणेकडून निषेध मोर्चा न काढण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे निषेध मोर्चा रद्द करण्यात आला.
साखरपा परिसरातील वातावरण तंग
या घटनेमुळे साखरपा परिसरातील वातावरण तंग झाले होते. पोलीस दलाकडून जादा कुमक मागवण्यात आली होती. संपूर्ण साखरपा बाजारपेठेत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारूती जगताप, देवरूखचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, संगमेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख उपस्थित होते.









