प्रतिनिधी / बेळगाव
तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी मुख्य कार्यालयात करण्यात आले. रोमा ठाकुर, संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक गिरीधर शंकर व दिवाळी अंकाचे संपादन प्रमुख बालमुकुंद पतकी उपस्थित होते.
प्रारंभी पतकी यांनी स्वागत केले. गिरीधर शंकर यांच्या हस्ते रोमा ठाकुर, जयवंत मंत्री आणि बालमुकुंद, पतकी यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. यावेळी जयवंत मंत्री म्हणाले, गुरूपुष्पामृत योगाच्या मुहूर्तावर दिवाळी अंकाचे प्रकाशन होत आहे हा सुयोग आहे. दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. स्थिती बिकट होती. परंतु अशाही परिस्थितीत जगणे हे मूळ आहे. यापुढे कोरोनाचे सावट पूर्ण दूर होईल आणि प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
रोमा ठाकुर यांनी दिवाळी अंकाची बांधणी उत्तम झाली असून त्याचे श्रेय हे तरुण भारतमधील प्रत्येकाचे आहे. सांघिक भावनेने केलेले काम नेहमीच यशस्वी होते, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
या अंकासाठी तरुण भारतचे अनेक संबंधित विभाग तसेच भरत जगताप, कैलास रांगणेकर, अनिता उसुलकर, गजानन वालावलकर यांचे सहकार्य लाभले असून कथा, कविता यांनी अंक भरगच्च आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवच्या निमित्ताने परिसंवाद घेण्यात आला आहे, असे बालमुकुंद पतकी यांनी सांगितले. गजानन वालावलकर यांनी आभार मानले. यावेळी तरुण भारत परिवारातील विविध विभाग प्रमुख तसेच अन्य सहकारी उपस्थित होते.









